भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत मध्य प्रदेशमधील २९ लोकसभा मतदारसंघांपैकी २४ ठिकाणच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. तर ५ जागांवर अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये ६ ठिकाणी विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामध्ये भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यावर प्रज्ञा सिंह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
भाजपा नेता आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर उमेदवारी नाकारण्यात आल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या की, मी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही उमेदवारी मागितली नव्हती आणि आताही मागणार नाही. उमेदवारी नाकारली गेल्याचा मला खेद नाही. माझं लक्ष्य भारताला विश्वगुरू बनवण्याचं आहे. मी ज्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली त्याला भोपाळच्या जनतेने पूर्ण पाठिंबा दिला होता, असेही प्रज्ञा सिंह म्हणाल्या.
भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाने यावेळी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी न देता आलोक शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. त्याबाबत प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, आरोल शर्मा यांचं स्वागत आहे. त्यांना विजयासाठी मी आशीर्वाद देते. भोपाळमध्ये काम करण्यासाठी खूप संधी आहे. उमेदवारी देण्याचा निर्णय हा संघटनेकडून केला जातो. जो निर्णय झाला आहे, तो सर्वोपरी आहे.