भोपाळ : भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करणाऱ्या भाजपा नेत्या उमा भारती यांची भेट घेतली. यावेळी उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना आपल्या हाताने खाऊ घातले. यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर भावूक झाल्या आणि त्यांचे डोळे पाणावले.
उमा भारती यांची भेट घेण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. त्यानंतर उमा भारती यांनी चमच्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना काहीतरी खायला दिले आणि आशीर्वाद दिला. यावेळी उभा भारती म्हणाल्या, 'दीदी माँ साध्वी प्रज्ञा निवडणूक लढवत असल्याने मी खूप खुश आहे. मी त्यांना महान संत आणि देश भक्त मानते, कारण त्यांनी जो त्रास सहन केला आहे. तो एक साधारण व्यक्ती सहन करु शकणार नाही.'
दरम्यान, काल उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संत म्हणून संबोधले होते. तसेच, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, 'साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर महान संत असून मी एक सर्वसाधारण मनुष्य आहे. त्यांच्यात आणि माझ्यात खूप अंतर आहे. त्यामुळे, माझी त्यांच्याबरोबर तुलना होऊच शकत नाही.' साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मध्य प्रदेशमध्ये तुमची जागा घेतील का? असे त्यांना विचारले असता त्यांनी यावर उत्तर दिले होते. मध्य प्रदेशमधील खजुराहो लोकसभा मतदार संघाच्या भाजपा उमेदवार बीडी शर्मा यांच्या प्रचारार्थ आल्या असताना उमा भारती पत्रकारांशी बोलत होत्या.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिल्यापासून त्या नेहमीत चर्चेत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि योगगुरू रामदेवबाबा यांनी आधीच प्रज्ञा सिंह यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यातच आता उमा भारतींनी संत म्हणून संबोधल्याने प्रज्ञा सिंह पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.