नवी दिल्ली: भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर नेहमीच काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्यांचे निधन विरोधी पक्षाने मारक शक्तीचा वापर केल्याने झाले असल्याचे प्रज्ञा सिंहने म्हटलं होते. या वादग्रस्त विधानानंतर प्रज्ञा सिंह ठाकूरला कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात बोलू नये असा आदेश भाजपाकडून देण्यात आल्याची बातमी होती. मात्र प्रज्ञा सिंहला अशी कोणतीच नोटीस भाजपाकडून दिली नसल्याचं भाजपाचे माध्यम प्रमुख लोकेंद्र पराशर यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात बोलू नये, तसेच यापुढे कोणतेही वादग्रस्त विधान केल्यास पक्षाकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील प्रज्ञासिंह ठाकूर यांना देण्यात आला असल्याची चर्चा होती. कारण याआधीही प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावरून अनेक वाद निर्माण झाले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र भाजपाकडून अशा प्रकारची कोणतीच नोटीस आली नसल्याचे मध्यप्रदेशमधील भाजपाचे माध्यम प्रमुख लोकेंद्र पराशर यांनी स्पष्ट केले आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपा कार्यालयात सोमवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा नेते बाबूलाल गौर यांच्यासाठी श्रद्धांजली सभा ठेवण्यात आली होती. यात प्रदेश भाजपाच्या नेत्यांनी दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या दरण्यान प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, मी जेव्हा निवडणूक लढवित होते त्यावेळी एक महाराज आले होते. त्यांनी मला सांगितले की, वेळ खूप खराब आहे, तुमची साधना वाढवा. विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग तुमच्या पक्षावर आणि नेत्यांवर करत आहे त्यामुळे सावधान राहा असं सांगितल्याचे विधान केले होते.