मुंबई : बुधवारी लोकसभेत एसपीजी (SPG) संशोधन बिलावर चर्चा सुरु होती. यावर डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी आपले मत मांडले. यावेळी नथुराम गोडसेच्या एका विधानाचा संदर्भ देत होते. यावेळी भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी त्यांना थांबवत तुम्ही एका देशभक्ताचे उदाहरण कसे काय देऊ शकता, असा सवाल केला होता. यावरून लोकसभेत गदारोळ उडाला होता. आज प्रज्ञा सिंह ठाकूरना संरक्षण मंत्रालयाच्या समितीच्या सल्लागार पदावरून काढून टाकल्याची घोषणा भाजपाने केली आहे.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे विधान लोकसभेच्या कार्यवाहीतून हटविण्यात आले आहे. तसेच, भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, या प्रकाराबद्दल भाजपा प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कारवाई करेल. यानुसार भाजपाने कारवाई केली आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना या समितीवरून हटविण्यात येत असल्य़ाचे म्हटले आहे. त्यांनी काल लोकसभेत केलेले वक्तव्य निंदनिय आहे. भाजपा कधीही अशा विचारांना थारा देणार नाही तसेच अशा वक्तव्यांचे समर्थनही करणार नाही. आम्ही संरक्षण सल्लागार समितीवरून तिला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या अधिवेशनात पक्षाच्या कोणत्याही बैठकीला तिला बोलविण्यात येणार नसल्याचे नड्डा यांनी सांगितले.
दरम्यान, प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी याआधीही नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचे विधान केले होते. त्यावेळी दक्षिणेतील अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असा दावा केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असे विधान केले होते. त्यानंतर वादास तोंड फुटले होते. मात्र भाजपाने प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यापासून अंतर राखताना त्यांना माफी मागण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली होती.
तर आपचे खासदार संजय सिंग यांनी राज्यसभेमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूरला निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.