भोपाळ - भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर नेहमीच वादग्रस्त विधान करुन चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मध्य प्रदेशच्या सेहोर येथील एका कार्यक्रमात त्यांनी वर्ण व्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित केल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. "ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं, तर वाईट वाटत नाही. मात्र शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं. कारण काय आहे, तर समजत नाही" असं म्हटलं आहे. तसेच "राष्ट्रहितासाठी क्षत्रियांनी जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावी" असं देखील वादग्रस्त विधान ठाकूर यांनी केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सेहोरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. "क्षत्रियाला क्षत्रिय म्हटलं तर त्याला वाईट वाटत नाही. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणा, तर वाईट वाटत नाही. वैश्याला वैश्य म्हटलं, तर वाईट वाटत नाही. शुद्राला शुद्र म्हटलं की, वाईट वाटतं. कारण काय आहे? तर समजू शकत नाही" असं विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.
"राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या जनसमूदायाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे. क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात, त्यामुळे त्यांनी अधिक मुलं जन्माला घालायला हवीत. क्षत्रियांचा वंशच संपला तर देशाचे रक्षण कोण करणार?" असं ठाकूर यांनी म्हटलं आहे. भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या घटनेवरून प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. "आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी होणार आहे आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू राज येणार आहे. आपली सत्ता संपुष्टात येणार असल्याची जाणीव झाल्यानेच ममता बॅनर्जी हताश झाल्या आहेत" असं म्हटलं आहे.
"तुम्ही मतं देऊन नेत्यांना विकत घेत नाही"; भरसभेत प्रज्ञा सिंह ठाकूर संतापल्या
ठाकूर यांनी याआधी व्यापाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच विकास कामं करणं हे लोकप्रतिनिधींच काम असलं तरी तुम्ही सुद्धा यासंदर्भात जागृक राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर या भोपाळमधील न्यू मार्केट परिसरामधील एका इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी मंचावर गेल्यानंतर ठाकूर यांनी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या व्यापाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. "तुम्ही लोकं आम्हाला मतदान करुन विकत घेत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. विकास कामं करणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. तुम्हीही यासंदर्भात जागृक राहण्याची गरज आहे. मात्र असं होताना दिसत नाही. तुम्ही जागृत नसल्यानेच भू-माफियांची दहशत वाढली आहे. तुम्ही जागृक नसल्याने विकासकाम होतं नाहीत" असं म्हटलं आहे.