नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजपावर मोठ्याप्रमाणात टीका होत असल्याने भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी ठाकूर यांना नोटीस पाठवत खुलासा मागितला होता. लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा ठाकूर भोपाळमधून निवडून आल्या आहे. प्रचार दरम्यान त्यांनी गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपाने 17 मे रोजी त्यांना नोटीस पाठवत 10 दिवसांच्या आत उत्तर मागितले होते. त्यानंतर आता प्रज्ञा सिंह यांनी भाजपाच्या नोटिशीला उत्तर पाठवलं आहे.
भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उत्तरामध्ये आपण आता पक्षशिस्त पाळणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच यापुढे आपला कारभार हा पक्षशिस्तीला अनुसरूनच असल्याचं सांगितलं आहे. तसेच मी पक्षाची शिस्तबद्ध सदस्य असून पक्ष संघटनेत शिस्त असली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केलं. संधी मिळाली तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आवडेल. भोपाळमध्ये असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील प्रज्ञा सिंह यांनी म्हटलं आहे.
प्रज्ञा सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा केला होता. 'त्या' विधानावरून भाजपाने हात वर केले होते. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी आपला सूर बदलत भाजपाची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे असं सांगितलं होतं. तसेच नथुराम गोडसेच्या विधानावरून त्यांनी माफी मागितली होती. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची माफी मागत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रज्ञा सिंह यांनी माफी मागत 21 तास मौन व्रत करणार असल्याचं म्हटलं होतं.
नथुराम गोडसेच्या विधानावरून प्रज्ञा सिंह यांनी 'हे माझं वैयक्तिक मत आहे. मी रोड शोमध्ये होते त्यावेळी जाताना मी हे उत्तर दिलं आहे. माझ्या भावना तशा नव्हत्या. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची मी माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं आहे ते विसरता येणार नाही. मी त्यांचा सन्मान करते. मी पक्षाच्या शिस्तीचं पालन करते. जी पक्षाची भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे' असं म्हटलं होतं. 'प्रज्ञा सिंह यांच्या त्या मताशी भाजपा सहमत नाही. आम्ही त्या विधानाचा निषेध करतो. तसेच प्रज्ञा सिंह यांच्याकडून भाजपा यासंदर्भात खुलासा मागणार असून, त्यांनी आपल्या विधानाची माफी मागावी' असं भाजपाचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी म्हटलं होतं. दरम्यान, प्रज्ञा सिंह यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळे झाला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता. त्यावेळीही त्यांना त्या विधानावरून विरोधकांनी धारेवर धरलं होतं.