कोलकाता : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीका होत आहे. मात्र, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बचाव करण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा सरसावले आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना खोट्या आरोपाखाली फसविले आहे, असा अमित शहा यांनी म्हटले आहे. कोलकाता येथील पत्रकार परिषदेत अमित शहा बोलत होते.
हिंदू दहशतवादाच्या नावाने एक बोगस केस तयार करण्यात आली. जगात देशाच्या संस्कृतीची बदनामी करण्यात आली. कोर्टात खटला चालल्यानंतर तो बोगस असल्याचे स्पष्ट झाले, असे अमित शहा म्हणाले. तसेच, स्वामी असीमानंद आणि अन्य लोकांवर खोट्या आरोपांखाली गुन्हे नोंद झाले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडले त्यांना का सोडले, असे सवाल अमित शहा यांनी उपस्थित केले आहेत.
याचबरोबर, अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला. पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचे अस्तित्वचं संपले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोपही अमित शहा यांनी केला आहे. बांगलादेशमधून जे हिंदू, बौद्ध, शीख, जैन आणि ख्रिश्चन निर्वासीत भारतात आले आहेत. त्यांना आम्ही नागरिकत्व देऊ. तसे स्पष्ट आश्वासन आम्ही भाजपाच्या संकल्प पत्रातून दिले आहे, असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेता शिवराज सिंह चौहान यांनीही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बचाव केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवराज सिंह चौहान म्हणाले, " कोणत्याही गुन्हाशिवाय साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कायद्याचा चुकीचा वापर करुन फक्त तुरुंगातच ठेवले नाही, तर त्यांना त्रास सुद्धा देण्यात आला."
‘मी शहिदांचा अपमान केला नाही’मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली होती. या नोटिसीला उत्तर देताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहिदांचा अपमान केला नाही, असे म्हटले आहे. "मी कोणत्याही शहीदाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. माझ्या भाषणातील एक लाइन पाहून चालणार नाही, तर पूर्ण भाषण पाहावे. तत्कालीन काँग्रेस सरकारकडून मला जो त्रास देण्यात आला होता, त्याचा मी उल्लेख केला होता.", असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या नोटिसीला उत्तर दिले आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर काय म्हणाल्या होत्या, वाचा त्यांच्याच भाषेत....."वो जांच अधिकारी सुरक्षा आयोग का सदस्य था, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया और कहा कि साध्वी को छोड़ दो. लेकिन हेमंत करकरे ने कहा कि मैं कुछ भी करूंगा लेकिन सबूत लाउंगा और साध्वी को नहीं छोड़ूंगा.""ये उसकी कुटिलता था ये देशद्रोह था धर्मविरुद्ध था, वो मुझसे पूछता था कि क्या मुझे सच के लिए भगवान के पास जाना होगा, तो मैंने कहा था कि आपको जरूरत है तो जाइए.""मैंने उसे कहा था तेरा सर्वनाश होगा, उसने मुझे गालियां दी थीं. जिसदिन मैं गई तो उसके यहां सूतक लगा था और जब उसे आतंकियों ने मारा तो सूतक खत्म हुआ."
भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.