मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी असलेली भाजपची भोपाळची खासदार प्रज्ञासिंह ठाकूर ही बुधवारी विशेष एनआयए न्यायालयात खटल्याच्या सुनावणीस उपस्थित राहिली. मात्र, न्यायालयाने खटल्यावरील सुनावणी १ डिसेंबरपर्यंत तहकूब केली.
विशेष न्या. पी. आर. सित्रे यांच्यापुढे प्रज्ञासिंह ठाकूर उपस्थित होती. प्रज्ञासिंहला समन्स बजावण्यात आले नव्हते. ती मुंबईत उपचारासाठी आली होती. ती स्वत:हून न्यायालयात उपस्थित राहिली आहे, असे ठाकूर हिच्या वकिलांनी सांगितले.
जानेवारीमध्ये खटल्याच्या सुनावणीस ठाकूर न्यायालयात उपस्थित होती. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह सात जण आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या खटल्यात आतापर्यंत आठ साक्षीदार ‘फितूर’ झाले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्या दुचाकीचा स्फोट झाला, ती दुचाकी ठाकूरच्या नावावर होती. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने ठाकूरची जामिनावर सुटका केली होती.