नवी दिल्ली : भोपाळमधील भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी लोकसभेत एका चर्चा सत्रादरम्यान महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त संबोधले. यावरून लोकसभेत एकच गदारोळ उडाला.
बुधवारी लोकसभेत एसपीजी (SPG) संशोधन बिलावर चर्चा सुरु होती. यावर डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी आपले मत मांडले. यावेळी नथुराम गोडसेच्या एका विधानाचा संदर्भ देत होते. गोडसेने म्हटले होते, की त्याने महात्मा गांधींना का मारले होते? असा उल्लेख ए. राजा यांनी केला. ज्यावेळी ए राजा बोलत होते, त्याचवेळी तुम्ही एका देशभक्ताचे उदाहण कसे काय देऊ शकता, असा सवाल प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. गोडसेने महात्मा गांधीची हत्या का केली? असा संदर्भ देत होते.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या या विधानानंतर लोकसभेत गदारोळ झाला. दरम्यान, प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे विधान लोकसभेच्या कार्यवाहीतून हटविण्यात आले आहे. तसेच, भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, या प्रकाराबद्दल भाजपा प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कारवाई करेल.
दरम्यान, प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी याआधीही नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचे विधान केले होते. त्यावेळी दक्षिणेतील अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असा दावा केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असे विधान केले होते. त्यानंतर वादास तोंड फुटले होते. मात्र भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यापासून अंतर राखताना त्यांना माफी मागण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली होती.