भोपाळ : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना वॉरंट पाठविण्यात आले आहे. एनआयए कोर्टाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांन १३ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही प्रज्ञा सिंह ठाकूर अनेकदा कोर्टात हजर राहिल्या नाहीत. दरम्यान, कोर्टाकडून वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्या आजारी असल्याचे दिसून येत आहे.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याचे कोर्टाने म्हटले आहे. यासोबतच या प्रकरणी अंतिम युक्तिवाद सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रज्ञा ठाकूर यांनी कोर्टात हजर राहणे आवश्यक असल्याचे एनआयए कोर्टाने म्हटले आहे. मात्र, प्रज्ञा सिंह ठाकूरने आपल्या तब्येतीचा हवाला देत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाणार आहे.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, "काँग्रेसचा छळ केवळ एटीएस कोठडीपर्यंतच वाढला नाही तर माझ्या संपूर्ण आयुष्यासाठी जीवघेणा त्रास झाला. मेंदूला सूज येणे, दृष्टी कमी होणे, ऐकायला कमी येणे, बोलण्यात असंतुलन, स्टेरॉईड्स आणि न्यूरो औषधांमुळे संपूर्ण शरीरात सूज येणे. एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत, जर जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन."
जामीनपात्र वॉरंट जारी२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या विशेष एनआयए कोर्टात अंतिम युक्तिवाद सुरू आहे. या प्रकरणात प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हजर राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे कोर्टाचे म्हणणे आहे. मात्र, प्रज्ञा सिंह ठाकूर कोर्टात हजर राहत नव्हत्या. त्यामुळे विशेष न्यायाधीश ए के लाहौती यांनी त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांना १३ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सार्वजनिक कार्यक्रमांपासूनही लांबदरम्यान, प्रज्ञा सिंह साध्वी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या आजारी असल्याचे दिसून येत आहे. प्रज्ञा सिंह साध्वी या माजी खासदार आहे. त्या भोपाळमधून भाजपच्या खासदार होत्या. त्यांनी अनेकदा आपल्या वक्तव्याने पक्षाला अडचणीत आणले आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. तसेच, सध्या त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासूनही दूर आहेत.