नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पहिल्यांदाच अमित शाहांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं आहे. पत्रकार परिषदेत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर अमित शाह म्हणाले, त्यांना उमेदवारी हा काँग्रेसच्या विरोधात आमचा सत्याग्रह आहे. काँग्रेसनं खोटी हिंदू दहशतवादाची संकल्पना आणली. विनाकारण लोकांना त्रास देण्याचं काम केलं. मतांच्या धुव्रीकरणासाठीच काँग्रेसनं असं केलं. काँग्रेसनं असं करून हिंदू संस्कृतीला पूर्णतः बदनाम केलं. काँग्रेसनं खोटी केस बनवल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, असंही अमित शाह म्हणाले आहेत.मी काँग्रेस पक्षाला विचारू इच्छितो की, समझोता एक्स्प्रेसमध्ये काही लोकांना पकडण्यात आलं. एक खोटी केस बनवून हिंदू दहशतवादाचं त्याला नाव देण्यात आलं. समझोता एक्स्प्रेसमधील लोकांची निर्दोष मुक्तता झाली असून, त्यांना 5-5 लाखांचा मोबदलाही मिळाला आहे. काँग्रेसनं देशाच्या सुरक्षेबरोबर समझोता केला. त्याबद्दल काँग्रेसनं पूर्ण जगासमोर माफी मागायला हवी, असंही अमित शाह म्हणाले आहेत.
अमित शहांनी सांगितलं प्रज्ञा सिंहांना उमेदवारी देण्यामागचं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 5:41 PM