Chandrayaan-3 ची मोहिम जवळपास फत्ते झाली आहे. आता प्रज्ञान रोव्हरचा झोपण्याचा वेळ झाला आहे. एक दोन दिवसांत चंद्राची दक्षिण बाजू पंधरवड्यासाठी अंधारात जाणार आहे. असे असताना चंद्रावर विक्रम उड्या मारत आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतू इस्रोचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. चार खुरांवर उभा असलेला विक्रम लँडरने ४० सेमी उंच उडी मारली आहे.
विक्रम लँडरने या उडीसोबत ३० ते ४० सेमीचे अंतरही कापले आहे. म्हणजेच आता फक्त रोव्हरच नाही तर लँडरही एका जागेवरून दुसऱ्या जारी जाऊ शकणार आहे. इस्रोने सुरुवातीला याची माहिती दिली नव्हती, परंतू आज याबाबत व्हिडीओ जारी केला आहे.
कशी केली तयारी...यासाठी विक्रमला कमांड देण्यात आली होती. यानंतर विक्रमचे इंजिन सुरु झाले. यासाठी रोव्हरचा उतरायचा रँप बंद करण्यात आला होता. उंच उडी मारण्यापूर्वी विक्रम लँडरचे रॅम्प, चेस्ट आणि इल्सा पेलोड्स बंद करण्यात आले होते. सॉफ्ट लँडिंगनंतर ते पुन्हा उघडण्यात आले आहेत. या काळात विक्रम लँडरने ४० सेमी उंच उडी मारली आणि जुन्या जागेवरून ३० ते ४० सेमी नवीन जागी स्थिरावला आहे.
प्रज्ञान संपला नाही, पुन्हा जागा होणार...चंद्रयान-3 चे प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये ठेवण्यात आले आहे. सूर्य पुन्हा उगवला की त्याला सौर ऊर्जा मिळेल, त्यानंतर ते पुन्हा सक्रिय होईल. लँडर-रोव्हर 14-15 दिवस अंधारात असणार आहेत. या काळात विक्रम लँडरला जागेच रहावे लागणार आहे. कारण या अंधाऱ्या रात्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमानासह विविध बदल टिपावे लागणार आहेत. दोन दिवस आधीच यासाठी बॅटरी चार्जिंग सुरु करण्यात आले आहे. हा टप्पा देखील इस्रोसाठी महत्वाचा असणार आहे.