राजस्थानच्या कोटा बुंदी लोकसभा मतदारसंघात उमेदवार जोरदार हल्लाबोल करत आहेत. काँग्रेसचे उमेदवार प्रहलाद गुंजल हे भाजपाचे उमेदवार ओम बिर्ला यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ओम बिर्ला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर तसेच ओएसडी आणि कोटा आयजी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
प्रहलाद गुंजल म्हणाले की, "प्रशासकीय यंत्रणेचा निवडणुकीत गैरवापर होत असून आयजी हे भाजपा उमेदवाराचे एजंट म्हणून काम करत आहेत, ते काँग्रेस कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत आहेत. यासोबतच लोकसभा कॅम्प ऑफिसचा भाजपा कार्यालय म्हणून वापर होत असून त्यांचे ओएसडी राजीव दत्ता खुलेआम प्रचार करत आहेत."
भाजपाचे उमेदवार ओम बिर्ला यांच्यावरही त्यांनी अनेक आरोप केले. ते म्हणाले की, "बिर्लाजींनी दहा वर्षांच्या कामगिरीच्या नावावर मतं मागावीत. त्यांच्या नावावर कोणतंच काम नाही. कोटाने स्वप्न पाहिलं की, उद्योग येतील, आयआयटी, एम्स, केंद्रीय विद्यापीठासारख्या संस्था येतील. कोटा प्रगतीच्या मार्गावर जाईल. पण कोटा निराश झाला, झोपेतून उठल्यावर जशी स्वप्नं तुटतात त्याचप्रमाणे त्यांचं स्वप्न भंगलं."
प्रहलाद गुंजल यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोग गप्प का आहे, हे कळत नाही, असे ते म्हणाले. निवडणुकीसाठी लोकसभेतील ओएसडी 10 ते 5 ड्युटीपर्यंत मर्यादित ठेवावी आणि आयजींना हटवावं. आयजी ओम बिर्ला यांचे एजंट म्हणून काम करत आहेत असंही म्हटलं.
"रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या घरावर ड्रोन उडवले जात आहेत. घरावर पूर्णपणे नजर ठेवली जात आहे. निवडणुकीत भीतीचे वातावरण निर्माण करून, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील निवडणुकीच्या या वसंतोत्सवात भीती दाखवून जनतेच्या भावना बदलता येणार नाहीत" असंही गुंजल यांनी म्हटलं आहे.