मोतिहारी : स्वच्छता अभियानात बिहार सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, १०० वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे आणि चंपारणच्या या पवित्र भूमीत स्वच्छता चळवळीतील स्वयंसेवकांच्या जनआंदोलनाचे एक चित्र रेखाटले जात आहे. १०० वर्षांपूर्वी चंपारणच्या पवित्र भूमीवर जनआंदोलनाचे असेच चित्र जगाने पाहिले होते आज पुन्हा एकदा लोक हे चित्र पाहत आहेत.पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला गर्व आहे की, सत्याग्रह ते स्वच्छताग्रहच्या या प्रवासात बिहारच्या लोकांनी पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची क्षमता दाखविली. स्वच्छता कार्यक्रमात बिहार सरकारच्या कामाचे कौतुक करताना ते म्हणाले की, गत एक आठवड्यात बिहारमध्ये ८ लाख ५० हजारपेक्षा अधिक शौचालयांची निर्मिती करण्यात आली. बिहारमधील विविध विकास कामांचा उल्लेख करुन मोदी म्हणाले की, आज ९०० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग योजनेचा शुभारंभ होत आहे. ही योजना बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांसाठी उपयोगी आहे़ पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी कटिहार आणि जुनी दिल्ली यादरम्यानच्या एका रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. मधेपुरात एका रेल्वे इंजिनच्या कारखान्याचे लोकार्पण केले आणि रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला.
स्वच्छतेबद्दल मोदींकडून बिहार सरकारची प्रशंसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 5:37 AM