बंगळुरू : अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले जनता दल (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवन्ना यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. जर्मनीहून बंगळुरूला आल्यानंतर प्रज्वल रेवन्ना यांना एसआयटीने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. त्यानंतर चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात घेऊन गेले.
आता प्रज्वल रेवन्ना यांना अटक केल्यानंतर त्यांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्याकडे असलेले सर्व पैसे आणि कपड्यांच्या पिशव्याही एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. एसआयटी कार्यालयात २ वाजेपर्यंत झोपण्याची परवानगी देण्यात आली. एसआयटीने अद्याप प्रज्वल रेवन्ना यांची चौकशी सुरु केलेली नाही. एसआयटी आजपासून प्राथमिक तपास सुरू करणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवन्ना यांची वैद्यकीय चाचणी होणार आहे. वैद्यकीय चाचणीत वजन, रंग, बीपी, साखर, हृदय गती (ECG), रक्त तपासणी, लघवी तपासणी केली जाईल. याचबरोबर, अटकेनंतर २४ तासांच्या आत एसआयटी प्रज्वल रेवन्ना यांना न्यायालयात हजर करेल आणि त्यांची पोलीस कोठडी मागेल. याआधी, कर्नाटक सरकारने गुरुवारी सांगितले होते की, प्रज्वल रेवन्ना हे भारतात परतले नाही तर त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यासारखी कारवाई केली जाईल.
कर्नाटकचे गृहमंत्री काय म्हणाले?प्रज्वल रेवन्ना यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले की, "प्रज्वल रेवन्ना हे काल रात्री साडेबारानंतर जर्मनीहून आले होते. त्यांना अटक करण्यात आली आहे, कायद्यानुसार काय कारवाई होईल, ते अधिकारी पाहतील. मी काल शिमोगाहून आलो. मी अधिकाऱ्यांशी बोललो नाही. तरीही त्यांनी कायद्यानुसार जे काही करावे लागेल ते करावे. पीडितांनी एसआयटीसमोर येऊन त्यांच्या समस्या सांगाव्यात, असे आम्ही यापूर्वीही म्हटले आहे."