अनुभा जैन
बंगळुरू : मी काहीही चुकीचे केलेले नाही आणि मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे माजी मंत्री एच.डी. रेवण्णा यांनी बुधवारी स्पष्ट केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आपल्यावरील आरोप तथ्यहीन आणि निराधार आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी खासदार प्रज्वल रेवण्णा ३ मे रोजी रात्री उशिरा बेंगळुरूत येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गृहमंत्री डॉ.जी. परमेश्वर म्हणाले, कथित सेक्स स्कँडल आणि क्लिप असलेल्या पेन ड्राइव्ह प्रकरणाशी संबंधित अनेकांच्या जीवनाचा प्रश्न आहे. त्यामुळेच एसआयटी तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. पुरावे पाहिल्याशिवाय आम्ही रेवण्णा किंवा कुणालाही अचानक अटक करणार नाही.पेन ड्राइव्ह प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी खासदार प्रज्वल रेवण्णा ३ मे रोजी रात्री उशिरा बेंगळुरूत येणार असल्याची माहिती मिळाली आहे. जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे ते सध्या सहलीला गेले आहेत.
प्रज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. हे प्रकरण उघडकीस येताच, त्या विरोधात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर प्रज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील एच.डी. रेवण्णांना नोटीस बजावण्यात आली आहे.
चौकशीसाठी राहणार उपस्थित
प्रज्वल रेवण्णा भारतात येण्यासाठी लुफ्तांसा एअरलाइन्सच्या विमानाचे ३ मे रोजीचे तिकीट बुक केल्याचे कळते. ते ४ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे.