मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभेच्या (UP Assembly Election 2022) पहिल्या फेरीतील मतदान 10 फेब्रुवारीला होत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत समाजवादी पार्टीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आपल्याला संविधान वाचवायचे असेल तर आता उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला मतदान करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेशातील जनतेला केले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकल्यास संविधान बदलतील. त्यामुळे आम्ही समाजवादी पार्टीला पाठिंबा देत आहोत. संविधान वाचवायचा असेल तर भाजपचा पराभव केला पाहिजे."
'बसपा आणि चंद्रशेखर आझाद याची परिस्थिती दयनीय'आम्ही आंबेडकरवाद्यांना विनंती करतो आता बसपाचा विचार करू नका, चांद्रशेखर आझाद यांचा विचार करू नका, सध्या तुम्ही संविधानाचा विचार करा आणि समाजवादी पार्टीला मतदान करा. सध्या बसपा आणि चंद्रशेखर आझाद या दोघांचीही परिस्थिती दयनीय आहे. आंबेडकरवाद्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. पण, अस्तित्व नंतरही निर्माण करता येते. त्यामुळे सध्या अस्तित्वाचा विचार सोडा आणि मानवतेचा विचार करा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
'रामदास आठवले भाजपचेच'आम्ही मुंबई महानगर पालिकेची निवडणूक गांभीर्याने घेतली असून पूर्ण ताकदीने लढणार आहोत. या निवडणुकीत आमच्यासोबत युती करण्यासाठी सगळ्यांना मार्ग खुले आहेत. फक्त भाजपला आमचे दरवाजे बंद आहेत. रामदास आठवले हे भाजपचेच आहेत आणि त्यांचे चिन्ह देखील कमळच आहे. आम्ही त्यांच्या सोबत युती करणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपणार उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज सांयकाळी संपणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 11 जिल्ह्यांतील शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, हापूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढमधील 58 जागांसाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारीसह 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.