नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली, तरी कोरोना मृत्यूचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुडवडा अद्यापही जाणवत आहे. कोरोना लसींच्या कमतरतेमुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम पडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता केंद्राकडून राज्यांना १.९२ कोटी लसींचे डोस देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. (prakash javadekar says central government will supply nearly 1 crore 92 lakh of corona vaccine)
देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दिलासादायक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. १६ मे ते ३१ मे या कालावधीत राज्यांना १.९२ कोटी लसींचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
राज्यांना मोठ्या प्रमाणावर लसींचा पुरवठा
देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून १.९२ कोटी लसींचे डोस पुरवले जाणार असून, या लसींचा मोफत पुरवठा केला जाणार असल्याचे जावडेकर यांनी नमूद केले आहे. यापूर्वी देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. देशातील कोरोना लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मस्तच! आता ‘आरोग्य सेतु’वर मिळणार प्लाझ्मा डोनरची लिस्ट; पाहा, डिटेल्स
२१६ कोटी लसींचे उत्पादन
ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये भारत आणि भारतीयांसाठी २१६ कोटी लसींचे उत्पादन करण्यात येईल. त्यामुळे कोरोनावरील लस ही सर्वांसाठी उपलब्ध होईल यात शंका नाही, असा विश्वासही व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केला. आतापर्यंत भारतात जवळपास १८ कोटी लसी दिल्या गेल्या आहेत. तर अमेरिकेमध्ये आतापर्यंत २६ कोटी डोस देण्यात आले आहेत. तर या क्रमवारीत चीन दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.
“कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी द्या”; तिहारमधील दहशतवाद्याची याचिका
दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. तर, ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी करोनावर मात केली. आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. सध्या देशात ३७,०४,८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात पॉझिटीव्हीटी रेट १८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत १८.७५ लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, आतापर्यंत १७,९२,९८,५८४ नागरीकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आल्या आहे.