केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज कोरोना संकट आणि लसीकरण मोहीमेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यासोबत जावडेकर यांनी देशातील कोरोना लसीकरणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत देशात सर्व नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालेलं असेल असा दावा जावडेकर यांनी यावेळी केला आहे.
"देशाचे पंतप्रधान जनतेसोबत मिळून कोरोना संकटाचा सामना करत आहेत. तर राहुल गांधी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना नौटंकी संबोधत आहेत. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे देशाचा आणि जनतेचा अपमान आहे. आम्ही अशाप्रकारच्या शब्दांचा वापर करणार नाही. कारण त्यांची नौटंकी जनतेनं केव्हाच बंद करुन टाकली आहे", असा जोरदार घणाघात प्रकाश जावडेकर यांनी यावेळी केला.
देशातील कोरोना लसीकरणाबाबत बोलत असताना जावडेकर यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली. "डिसेंबर २०२१ पर्यंत देशात लसीकरणाची मोहीम पूर्ण होईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तोपर्यंतचा २१६ कोटी लसींच्या डोसचा उत्पादनाचा रोडमॅप सादर केला आहे", असं जावडेकर म्हणाले. देशात आतापर्यंत २० कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्याचा प्रश्न देखील समोर आला आहे. लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून उत्पादन वाढविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. लवकरच लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.