नवी दिल्ली - गेल्या कित्येक दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात ताण पडतोय. असं असलं तरी दुसरीकडे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. महिन्याभराच्या कालावधीत सिलिंडरच्या दरात झालेली ही चौथी वाढ आहे. सिलिंडरच्या दरात 25 रूपयांची वाढ झाली आहे. याच दरम्यान अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सरकारला लाज वाटायला हवी" असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "गेल्या तीन महिन्यांत गॅस सिलिंडची किंमत 225 रुपयांनी वाढली आहे" अशा आशयाचं ट्विट केलं असून सरकारला लाज वाटायला हवी असं म्हणत बोचरी टीका केली आहे. गेल्या तीन महिन्यांत 1 डिसेंबर, 1 जानेवारी, 4, 15, 25 फेब्रुवारी, 1 मार्च रोजी सिलिंडरच्या दरात कशी वाढ झाली याबाबत माहिती त्यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे. एलपीजीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे.
राहुल गांधी यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. सिलिंडरच्या वाढत्या दरावरून निशाणा साधला होता. "एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय – व्यवसाय बंद करा, चूल फूका, खोटी आश्वासनं खा" असं ट्विट करत राहुल गांधी केलं असून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात 100 रूपयांची वाढ झाली होतीय यापूर्वी 25 फेब्रुवारी रोजी गॅसचे दर 25 रूपयांनी वाढले होते. त्यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी 25 रूपये, त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी 50 रूपयांची वाढ करण्यात आली होती.
देशात पुन्हा एकदा विनाअनुदानीत सिलिंडरच्या दरात 25 रूपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत आता घरगुती गॅसचे दर 794 रूपयांवरून वाढून 819 रूपये इतके झाले आहेत. तर मुंबईत सिलिंडरचे नवे दर 819 रूपये, कोलकात्यात 845.50 रूपये आणि चेन्नईमध्ये नवे दर आता 835 रूपये झाले आहेत. जानेवारी महिन्यात कंपन्यांनी या दरात कोणतेही बदल केले नवते परंतु फेब्रुवारी महिन्यात सलग तीनदा हे दर वाढवण्यात आले. गॅसचे नवे दर पाहण्यासाठी तुम्हाला सरकारी इंधन कंपन्यांच्या संकेतस्थळावरही माहिती मिळू शकते. या ठिकाणी इंधन कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करत असते. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या संकेतस्थळावर जाऊनही तुम्हाला गॅस सिलिंडरचे नवे दर पाहता येऊ शकतात.
"पंतप्रधान मोदींकडून पदाचा दुरुपयोग, कोरोना योद्ध्यांचं श्रेयही हडपण्याचा प्रयत्न"
पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान तृणमूल काँग्रेसने (TMC) पुन्हा एकदा भाजपा (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) हल्लाबोल केला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन (Derek Obrien) यांनी पंतप्रधान मोदींवर पदाच्या दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. कोरोना योद्ध्यांचं श्रेय मोदी स्वत: घेत असल्याचं देखील ओब्रायन यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींकडून सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे, असं ओब्रायन यांनी म्हटलं आहे. तसेच डेरेक ओब्रायन यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला एक पत्रंही लिहिलं आहे. कोरोना लसीकरणानंतर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्यावर तृणमूल काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. कोरोनाच्या संकटात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांचं आणि इतर कोरोना योद्ध्यांचं श्रेय मोदी स्वत: घेत असल्याचं देखील ओब्रायन यांनी म्हटलं आहे.