मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाच राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशात मोठा राजकीय भूकंप आला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर, आज त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. शिंदेंच्या राजीनाम्यानंतर देशभरातील राजकीय क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. यात, अभिनेता आणि नेता प्रकाश राज यांनीही आपलं मत व्यक्त केलंय. प्रकाश राज यांनी ट्विटरवरुन मध्य प्रदेशातील राजकारणावर भाष्य केलंय.
ज्योतिरादित्य यांच्या भाजपा प्रवेशाचा 'आत्याला अत्यानंद', भावूक प्रतिक्रिया व्यक्त
ज्योतिरादित्य शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. तसेच मधल्या काळात त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेसचं पक्षचिन्ह हटवल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यानंतर काहीच घडलं नाही. मात्र, काल अचानक शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडं सोपवल्यानं खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासारखा मोहरा गेल्यामुळं काँग्रेसमध्येही चिंतेचं वातावरण आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनामाबाबत राज्यातील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता या राजीनाम्यानंतर काँग्रेसचं मोठं नुकसान होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तर, अनेक काँग्रेस नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यात, अनेकांनी शिंदे यांच्यावर टीकाही केलीय.
दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील आघाडीचे अभिनेता आणि कम्युनिष्ट पक्षाचे नेते प्रकाश राज यांनी एक ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रकाश राज यांनी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. त्यामध्ये, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हातात, कमळ आणि कमलनाथ यांच्या हाता फक्त नाथ राहिंलं, असे त्यांनी दर्शवलं आहे. तसेच, या फोटोसह एक प्रश्नही विचारला आहे. हे चित्र कुणी बनवलं? असा प्रश्न त्यांनी विचारला.