नवी दिल्ली : भाजप नेते आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी अविश्वास ठरावाबाबत विरोधकांवर सडकून टीका केली. अविश्वास प्रस्ताव आणून काळे कपडे घालून काहीही होणार नाही. यानंतरही काळे कपडे घालूनच फिरावे लागेल, अशा शब्दांत प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्यास आधीच सांगितले होते. त्यासाठी तुम्ही तयारी करा. ते तयारी करून आले आहेत, पण त्यांची तयारी पूर्ण झालेली नाही, असेही प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
काँग्रेसने अविश्वास ठरावासाठी इतर विरोधी पक्षांशी कोणतीही चर्चा केली नाही. त्यांनी कोणाचाही सल्ला न घेता अविश्वास प्रस्ताव दिला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्षांचा विश्वास जिंकायला हवा. नंतर त्या लोकांच्या आत्मविश्वासाबद्दल बोलले पाहिजे, असे प्रल्हाद जोशी म्हणाले. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जो विश्वास आहे, तो देशातील जनतेने 2014 आणि 2019 मध्ये दाखवून दिला आहे आणि 2024 मध्येही दाखवून देईल. अविश्वास प्रस्ताव आणून काळे कपडे घालून काहीही होणार नाही. यानंतरही काळे कपडे घालून फिरावे लागेल, असे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
दरम्यान, मणिपूर हिंसाचारावरुनसंसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारविरोधात विरोधकांचा हल्लाबोल सुरूच आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्ष मणिपूरच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांचे खासदार आज काळे कपडे परिधान करून सभागृहात पोहोचले आणि केंद्र सरकारचा निषेध केला. गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात विरोधी पक्षांची बैठक झाली. ज्यामध्ये सभागृहाच्या कामकाजाच्या रणनीतीवर चर्चा झाली. या बैठकीत १७ पक्षांचे खासदार सहभागी झाले होते.
जनतेचा नरेंद्र मोदींवर विश्वास - प्रल्हाद जोशीप्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी सुद्धा विरोधकांवर हल्लाबोल केला होता. संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या गदारोळानंतर प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांच्या अविश्वास ठरावावर म्हटले होते की, यापूर्वीही धडा शिकवला आहे आणि यावेळीही धडा शिकवू. जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. दरम्यान, लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने बुधवारी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला. या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला मंजुरी देण्यात आली आहे.