Acharya Pramod Krishnam : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्याने राजकारण तापले आहे. या प्रकरणावर आता माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) यांची प्रतिक्रिया आली आहे. "मल्लिकार्जुन खरगे नावाचे हिंदू आहेत, त्यांची कृती हिंदूंची वाटत नाही," अशी टीका त्यांनी केली.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "मल्लिकार्जुन खरगे हे त्यांच्या नावावरुन हिंदू वाटतात, पण त्यांच्या कृतीतून हिंदू वाटत नाही. त्यांनी आधी ते कोण आहेत, ते हिंदू आहेत की, नाही, हे सांगायला हवे. त्यांची विधाने सनातनला शोभणारी नाहीत. अशा व्यक्तीला भारतात राजकारण करण्याचा अधिकार नाही," अशी टीका त्यांनी केली.
'भाष्य करणे योग्य नाही'ते पुढे म्हणाले, "जो सनातनच्या विरोधात आहे, तो भारताच्या विरोधात आहे. जो भारताच्या विरोधात आहे, तो सनातनच्या विरोधात आहे. ते एवढे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना हिंदू संतांचा, सनातनचा आणि भगव्याचा अपमान करणे शोभत नाही. हा 'ऋषी प्रधान' देश आहे आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर अशी टिप्पणी करणे अशोभणीय आहे," असेही ते यावेळी म्हणाले.
भाजपही खरगेंवर नाराजकाँग्रेस अध्यक्षांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले, "काँग्रेसचा डीएनए हिंदुत्वविरोधी आणि सनातनविरोधी आहे. काँग्रेसवाले म्हणतात की, भगवे कपडे घालणाऱ्यांनी राजकारणात येऊ नये. पण मौलाना आणि मौलवींबद्दल ते हे बोलतील का? ही तीच काँग्रेस आहे, जी 'भगवा दहशतवाद', 'हिंदू दहशतवाद' असे शब्द उच्चारते. असे. ते इतर धर्मांबद्दल असे कधीच बोलणार नाहीत," अशी टीका पूनावाला यांनी केली.