नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘द प्रेसिडेन्शियल इअर्स’ या आपल्या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारसंदर्भात बरेच काही लिहिले आहे. सरकारच्या अनेक निर्णयांकडे त्यांनी अत्यंत बारकाईने पाहिले आहे आणि त्यावर टीकाही केली आहे. त्यांनी आपल्या या पुस्तकात, मोदी सरकार आपल्या पहिल्या कार्यकाळात प्राथमिक जबाबदाऱ्याही व्यवस्थितपणे पार पाडू शकले नाही. तसेच संसदेचे कामकाजही व्यवस्थितपणे पार पडू शकले नाही, असे म्हटले आहे.
मुखर्जी म्हणाले, आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदींची कार्यशैली एखाद्या हुकुमशाह सारखी होते. पंतप्रधान मोदींच्या अचानक पाकिस्तान दौऱ्यावर बोलताना ते म्हणाले, न बोलावताच कसलीही आवश्यकता नसताना नवाज शरीफ यांना भेटायला जाणे, हे दोन्ही देशांच्या संबंधांसाठी योग्य म्हटले जाऊ शकत नाही.
रूपा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात मुखर्जी यांनी अरुणाचल प्रदेश सरकार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात बरेच काही लिहिले आहे. नोटाबंदी करण्यापूर्वी आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा सल्ला घेण्यात आला नव्हता. मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आपल्याला समर्थन मागितले, असेही मुखर्जी यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
प्रणब मुखर्जी हे त्यांच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करत नव्हते. स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुने म्हणून बराक ओबमा हे भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते, की त्यांना राष्ट्रपतींसोबतच समारंभासाठी यावे लागेल आणि त्यांना येथील सुरक्षा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल.
प्रणव मुखर्जीं यांनी पुढे लिहिले, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जापानबोरबरचे संबंध अधिक चांगले झाले आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. जापानसोबत 2014पूर्वीही चांगलेच संबंध होते. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीही शिंजो आबे भारतात आले होते.’ सर्जिकल स्ट्राईकही सामान्य लष्करी ऑपरेशन होते, असेही प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. तसेच या सैन्य कारवाईचा अशा प्रकारे प्रचार करणे योग्य नव्हते, या कारवाईतून आपल्याला काहीही साध्य झाले नाही, असेही मुखर्जी म्हणाले.