नवी दिल्ली : थोर समाजसेवक नानाजी देशमुख व प्रख्यात संगीतकार आणि गीतकार भूपेन हजारिका या दोघांना मरणोत्तर, तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गुरुवारी सन्मानित करण्यात आले. देशमुख, हजारिका व मुखर्जी हे अनुक्रमे ४६, ४७ व ४८ वे ‘भारतरत्न’ ठरले.राष्ट्रपती भवनाच्या आलिशान अशोक दालनात झालेल्या छोटेखानी; पण दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुरस्कारांचे वितरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंग व अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री, लालकृष्ण अडवाणी व डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.नानाजी देशमुख यांच्या वतीने त्यांनी स्थापन केलेल्या चित्रकूट येथील दीनदयाळ शोध संस्थानचे अध्यक्ष वीरेंद्रजित सिंग यांनी, तर हजारिका यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव तेज यांनी ‘भारतरत्न’चा स्वीकार केला. राष्ट्रपती कोविंद यांनी एक पायरी खाली उतरून आपले पूर्वसुरी असलेल्या प्रणवदांच्या गळ्यात ‘भारतत्न’चे पदक घालून सन्मानपत्र प्रदान केले. त्यानंतर दोघांमध्ये दीर्घ हस्तांदोलनही झाले. उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करून परस्परांच्या या आदरभावास दाद दिली. याआधी प्रणव मुखर्जी यांना प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ‘पद्मविभूषण’ प्रदान झाले तेव्हाही राष्ट्रपतीने माजी राष्ट्रपतींना सन्मानित करण्याचा सोहळा पाहायला मिळाला होता.सन्मानित होणारे चौथे माजी राष्ट्रपती‘प्रजासत्ताक होण्याआधीचे गव्हर्नर जनरलचे पद राष्ट्रपतीपदाच्या समकक्ष मानले तर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी व डॉॅ. व्ही. व्ही. गिरी यांच्यानंतरचे ‘भारतरत्न’ने सन्मानित होणारे प्रवण मुखर्जी हे देशाचे चौथे माजी राष्ट्रपती ठरले.डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. झाकीर हुसैन व डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम या ‘भारतरत्न’च्या मानकऱ्यांनीही देशाचे राष्ट्रपतीपद भूषविले.प्रणव मुखर्जी सन २०१२ ते २०१७ या काळात राष्ट्रपती असताना २०१५ या एकाच वर्षी ‘भारतरत्न’ जाहीर झाले होते व त्यावेळी मुखर्जी यांच्या हस्ते पं. मदनमोहन मालवीय व अटल बिहारी वाजपेयी यांचा गौरव करण्यात आला होता.
प्रणव मुखर्जी ‘भारतरत्न’ने सन्मानित; नानाजी देशभुख, भूपेन हजारिका यांचाही मरणोत्तर गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 2:15 AM