काँग्रेसच्या इफ्तार पार्टीला प्रणव मुखर्जींना निमंत्रण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:00 PM2018-06-11T16:00:19+5:302018-06-11T16:00:19+5:30
काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रणवदांना संघाच्या व्यासपीठावर जाण्यास विरोध केला होता.
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावणारे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिल्लीत काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीचे निमंत्रण न देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने नाराज होऊन प्रणवदांना निमंत्रितांच्या यादीतून वगळल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
एकीकडे काँग्रेसने या इफ्तार पार्टीसाठी सर्वपक्षीयांना आग्रहाचे निमंत्रण दिले असताना स्वत:च्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दूर ठेवले आहे. मुखर्जी यांच्यासह माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही काँग्रेसने इफ्तार पार्टीसाठी निमंत्रित केलेले नाही. काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये १३ जूनला ही पार्टी होणार आहे. ज्या राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे त्यांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्यास सांगितले आहे.
प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रणवदांना संघाच्या व्यासपीठावर जाण्यास विरोध केला होता. परंतु, प्रणव मुखर्जी यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत या सोहळ्याला हजेरी लावली होती.