नवी दिल्ली - पंतप्रधानपदासाठी माझ्यापेक्षा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अधिक पात्र होते असं वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं आहे. 'माझ्यापेक्षा अधिक योग्यता आणि पात्रता असतानाही पंतप्रधानपदासाठी दुर्लक्षित केल्याची तक्रार करण्यासाठी प्रणव मुखर्जींकडे अनेक कारणे आहेत, पण त्यावेळी माझ्याकडे कोणताच पर्याय नसल्याची त्यांना कल्पना होती. यामुळेच आमच्या संबंधात काही फरक पडला नाही', असं मनमोहन सिंग बोलले आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ‘द कोअॅलिशन इयर्स 1996-2012’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. महत्वाचं म्हणजे शुक्रवारी पार पडलेल्या या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते. मनमोहन सिंह यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला.
'2004 रोजी जेव्हा सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदासाठी माझी निवड केली, तेव्हा प्रणव मुखर्जी माझ्या प्रतिष्ठित सहका-यांपैकी एक होते. पंतप्रधान होण्यासाठी ते अधिक पात्र होते, आणि याची तक्रार करण्याचं प्रत्येक कारण त्यांच्याकडे होते. पण माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता याचीही त्यांनी कल्पना होता', असा खुलासा मनमोहन सिंग यांनी केला आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
'प्रणव मुखर्जी हे ठरवून राजकारणात आले आहेत. देशातील एक सर्वोत्तम राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण मी अपघाताने राजकारणात आलो. पी व्ही नरसिंह राव यांनी मला अर्थमंत्री बनण्याची ऑफर दिली आणि तिथून माझा राजकीय प्रवास सुरु झाला', असं मनमोहन सिंग बोलले आहेत. यावेळी मनमोहन सिंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करत त्यांचंही कौतुक केलं. युपीए सरकार व्यवस्थित चालण्याचं श्रेय प्रणव मुखर्जींचं असल्याचंही मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितलं. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मात्र यावेळी कोणतंही भाषण केलं नाही.
प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, 2004 च्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान कोणाला बनवण्यात येणार यावरुन पक्षात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. 'सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारल्यानंतर माझी निवड करण्यात येईल अशी अपेक्षा होती. सरकारमधील माझा दिर्घ अनुभव लक्षात घेता मला पंतप्रधानपद केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती', असंही त्यांनी सांगितलं आहे.
‘द कोलिशन इयर्स 1996-2012’ या पुस्तकात प्रणव मुखर्जी यांनी 1996च्या संयुक्त मोर्चा सरकारपासून यूपीए-2च्या कार्यकाळापर्यंतच्या सर्व राजकीय घडामोडींचा उल्लेख केला आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह यूपीएतील अनेक नेते उपस्थित होते. सिताराम येचुरी यांनी प्रणव मुखर्जींचं कौतुक करताना हत्तीप्रमाणे स्मरणशक्ती असल्याचं म्हटंल.