नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणामध्ये येणार नाहीत, असे त्यांची कन्या व काँग्रेसनेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.२०१९च्या आगामी लोकसभा निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी रा. स्व. संघ पुढे करण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावर शर्मिष्ठा यांनी शिवसेनेला हे प्रत्युत्तर दिले आहे.रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी नागपूर येथे गेल्या आठवड्यात संघ मुख्यालयात झालेल्या समारंभात प्रणव मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. तिथे त्यांनी दिलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात उदंड चर्चा झाली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते की, आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपाला बहुमतासाठी आवश्यक जागा जिंकता आल्या नाहीत, तर पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे करण्याचा संघाचा इरादा आहे.त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शर्मिष्ठा मुखर्जी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, माझे वडील प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणात येण्याची अजिबात शक्यता नाही. मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार, असे जाहीर झाल्यानंतर शर्मिष्ठा यांनी टिष्ट्वट करून जाहीर नापसंती व्यक्त केली होती. या उपस्थितीमुळे भाजपा व संघाला अफवा पसरविण्यास आयती संधी मिळेल, असा सावधगिरीचा इशाराही शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांना दिला होता.
प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणामध्ये येणार नाहीत; शर्मिष्ठा यांचे प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 5:10 AM