नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल संपल्यानंतर पहिल्यांदाच प्रणव मुखर्जी यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी 2014च्या निवडणुकांसह जीएसटी, नोटाबंदीवर मत प्रदर्शन केलं आहे. मुखर्जी यांनी मनमोहन सिंग यांना त्यावेळी पंतप्रधान बनवण्याचा सोनिया गांधींनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. मनमोहन यांना पंतप्रधान बनवणं ही सोनिया गांधींची सर्वोकृष्ट निवड होती, असंही ते म्हणाले. तिकिटातील घोळ व विखुरलेल्या महाआघाडीमुळे यूपीएला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी 2012मध्ये अचानकपणे यूपीएशी घेतलेला काडीमोडी हेसुद्धा काँग्रेसचा पराभव होण्यातील प्रमुख कारण आहे.प्रणव मुखर्जी म्हणाले, 132 वर्षं जुना काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत परतणार नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. पेट्रोल व डिझेलचे वाढलेले भाव, जीएसटी व दिवसेंदिवस डळमळीत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेच्या प्रश्नावरही मुखर्जी यांनी दिलखुलास उत्तरे दिली आहेत. जीएसटीचा घेतलेला निर्णय योग्य आहे. परंतु जीएसटी लागू करण्यामध्ये अडचणी तर येणारच आहेत. सोनिया गांधी या सुरुवातीला काहीशा मवाळ होत्या. मात्र वाजपेयी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यात बदल झाला, असंही ते म्हणाले आहेत.मी बराच काळ राज्यसभेचा सदस्य राहिलो आहे. मी फक्त 2004मध्येही लोकसभेची जागा जिंकली होती. मला हिंदी भाषा माहीत नव्हती. त्यामुळे हिंदी येत नसलेल्या व्यक्तीनं भारताचा पंतप्रधान बननं चुकीचं आहे. कामराज एकदा म्हणालेसुद्धा होते की, हिंदी येत नसलेल्या व्यक्तीला पंतप्रधान बनवता येणार नाही. यूपीए एकची महाआघाडी सुरळीत होती. त्या तुलनेत मात्र यूपीए दोनची महाआघाडी एवढी चांगली नव्हती. 2012मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत आघाडी टिकवण्यासाठी फार अडचणींचा सामना करावा लागला होता. तसेच येत्या दिवसांत काँग्रेस पुन्हा एकदा देशात परतेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवणं त्यावेळीची सर्वोकृष्ट निवड- प्रणव मुखर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 11:39 AM