नवी दिल्ली, दि. 3- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी पत्राच्या स्वरूपात खास भेट दिली आहे. याआधी प्रणव मुखर्जी माझ्या वडिलांसारखे आहेत, असं म्हणत मोदींना प्रणव मुखर्जी यांचा सन्मान केला होता. आता मोदींनी प्रणव मुखर्जी यांना एक पत्र लिहिलं आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदींनी दिलेलं पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेलं पत्र मनाला भावणारं आहे, असं प्रणव मुखर्जी यांनी म्हंटलं. सुरूवातीला नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये नवीन असताना प्रणव मुखर्जी यांनी कसं मार्गदर्शन केलं, याचा उल्लेख मोदींनी त्यांच्या पत्रात केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं पत्र शेअर करताना प्रणव मुखर्जी म्हणाले,'राष्ट्रपती कार्यालयातील माझ्या शेवटच्या दिवशी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पत्र दिलं आहे. हे पत्र माझ्या मनालं भावलं आहे. आता ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात प्रणव मुखर्जी यांना प्रेरणा स्त्रोत म्हंटलं आहे.
On my last day in office as the President, I received a letter from PM @narendramodi that touched my heart! Sharing with you all. pic.twitter.com/cAuFnWkbYn
— Pranab Mukherjee (@CitiznMukherjee) August 3, 2017
मोदींनी पत्राल लिहिलं, तुम्ही आता एका नव्या पर्वाची सुरूवात करत आहात. राष्ट्रपती असताना तुम्ही या देशाला खूप प्रेरणा दिली आहे. तीन वर्षापूर्वी नवी दिल्लीत मी नवखा होतो. इथे काम करणं माझ्यासाठी एक आव्हान होतं. पण या काळात तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे मला मार्गदर्शन केलं आणि मदत केली. तुमच्याकडे मोठा राजकीय, आर्थिक, वैश्विक अनुभव आहे ज्याचा फायदा मला आणि माझ्या सरकारला वेळोवेळी झाला आहे. आपण दोघांचा राजकिय प्रवास वेगळा, आपले विचारही वेगळे होते. मी फक्त एका राज्यातून काम करून आलो होतो. तरीही तुमच्या अनुभवाच्या मदतीने आपण एकत्र काम केलं.
तुम्ही माझ्यासाठी नेहमी स्नेही आणि माझी काळजी घेणारे होतात. माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तुम्ही केलेला एक फोन मला नवी ऊर्जा द्यायचा. माझ्या लांबलचक चालणाऱ्या बैठका आणि कॅम्पन्सनी भरलेल्या दिवसांमध्ये तुमचा येणार एक फोन माझ्यात नवा उत्साह निर्माण करायचा. नवा उत्साह मिळविण्यासाठी तुमचा फक्त एक फोन पुरेसा असायचा.
संसदेत निरोप समारंभाच्या वेळी प्रणव मुखर्जींनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचाही या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. त्यासाठी मोदींनी प्रणव मुखर्जी यांचे पत्रातून आभार मानले आहेत.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदींनी दिलेलं पत्र ट्विट केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ट्विटला उत्तर दिलं आहे. 'प्रणव दा! तुमच्या सोबत काम केलेल्या दिवसांना मी नेहमीच लक्षात राहिल, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Pranab Da, I will always cherish working with you. @CitiznMukherjeehttps://t.co/VHOTXzHtlM
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2017
प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपला. तर नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै रोजी राष्ट्रपतिपदी शपथ घेतली.