मुंबई - निवडणूक आयोगाने नुकतेच देशातील 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. त्यामध्ये, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे. त्यापैकी, केरळ विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या उमेदवार निवड समितीमध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. केरळ राज्याच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार छानणी समिती (स्क्रीनिंग कमिटी) च्या सदस्य पदावर आमदार प्रणिती शिंदे याची निवड केली आहे. मंगळवार 02 मार्च 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांची केरळ राज्याच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार छानणी समिती (स्क्रीनिंग कमिटी) च्या सदस्य पदावर निवड करण्यात आल्याचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिलं आहे. तर, एच. के. पाटील हे या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. प्रणिती शिंदेच्या या निवडीमुळे पुन्हा एकदा शिंदे कुटुंबीयांवर काँग्रसने विश्वास दाखवत सोलापूरवर मोठी जबाबदारी दिली आहे. तर, या समितीममध्ये त्या महाराष्ट्रातील एकमेव नेत्या आहेत.
दरम्यान, गेल्याच महिन्यात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षाने जबाबदारी दिली आहे. त्यावेळीही, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष व उपाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली. सहा. कार्यकारी अध्यक्षांमध्ये आमदार शिंदे यांचाही समावेश आहे. सोलापूरला बऱ्याच काळानंतर प्रदेश कमिटीत स्थान मिळाल्याचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी सांगितले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रदेश अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून दोनवेळा पदभार सांभाळला आहे. त्यानंतर प्रदेश कमिटीवर माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, यलगुलवार, रामहरी रूपनवर, कै. विष्णुपंत कोठे, हेमू चंदेले, सुधीर खरटमल यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. कार्यकारी अध्यक्षपदावर आमदार शिंदे यांच्या नियुक्तीमुळे सोलापूरला पहिल्यादांच मान मिळाला आहे.
1 जून रोजी संपणार कार्यकाळ
तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे, विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी निवडणुकांसाठी मतदानप्रकिया पार पडणार आहे. तर, केरळ विधानसभा निवडणूकीसाठी एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे.