पाण्यासाठी प्रणिती शिंदे यांची मध्यस्थी आज पाणी सोडणार: स्मार्ट सिटीचे जे झाले ते चुकीचे
By admin | Published: July 12, 2015 9:58 PM
सोलापूर :
सोलापूर : सोलापूरला उजनीतून पाणी सोडण्याबाबत आ़ प्रणिती शिंदे यांनी रविवारी दुपारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी संवाद साधला़ त्यावर देशमुख यांनी उजनीतून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे खात्याला आदेश दिले जातील, असे सांगितले़ स्मार्ट सिटी योजनेचा लाभ घेण्यासाठी सोलापूर शहराचा प्रस्ताव पाठविण्यासंबंधी विशेष सभा घेऊन ठराव पाठविण्याबाबत सत्ताधार्यांनी टाळाटाळ केली़ सभागृह नेते संजय हेमगड्डी यांच्या वक्तव्यावरुन भाजपामध्ये वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली होती़ या पार्श्वभूमीवर आ़ शिंदे यांनी पालकमंत्री देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून उजनीतून पाणी सोडण्याबाबत विनंती केली़ स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावरुन राजकारण करुन सोलापूरच्या विकासामध्ये आडकाठी आणण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका नाही़ महापालिकेत जे झाले ते चुकीचे होते, पण सोमवारच्या सभेत स्मार्ट सिटीचा ठराव घेऊन तो मंजूर केला जाईल़ शहराची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन आपणही हिच भूमिका घ्यावी़ लोकांना पाण्यासाठी वेठीस न धरता १४ जुलैपर्यंत पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली़ त्यावर पालकमंत्री देशमुख यांनी उजनीतून पाणी सोडण्याबाबत सोमवारी पाटबंधारे खात्याला आदेश दिले जातील, असे आश्वासन दिले आहे़ आ़ शिंदे यांच्या पुढाकाराने पाण्याचा प्रश्न व स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावरुन झालेल्या गोंधळावर पडदा पडण्याची चिन्हे दिसत आहेत़ (प्रतिनिधी)