सोनगड - श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टतर्फे आठदिवसीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा करण्यात आला. १९ जानेवारीपासून विविध प्रकारचे विधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले आणि २६ जानेवारी रोजी भगवान बाहुबली यांच्यावरील महामस्तकाभिषेकाने या भव्य आणि दिव्य अनुभूती देणाऱ्या सोहळ्याची सांगता झाली.
या सोहळ्याचे प्रमुख निमंत्रक आणि विश्वस्त नेमिष शाह यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तबद्ध नियोजनाने बाहुबली भगवान यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुफळ संपूर्ण झाला. या सोहळ्यात नूतन जिनमंदिर निर्माण करून सुमारे १३० देवतांचे पूजन, स्थापना करण्यात आली. नेमिष शाह यांच्या विनंतीला मान देऊन या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मनसुख मांडवीय यांनी विशेष हजेरी लावली.
या विशेष सोहळ्याला भारतातून, तसेच परदेशातील विविध ठिकाणांहून १५ ते २० हजार भाविक उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, शोभायात्रा, गुरूंचे प्रवचन, असे नेटके आयोजन करण्यात आले होते.
४१ फुटांची भगवान बाहुबली यांची प्रतिमाश्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्ट यांनी सोनगड येथे ५० फूट उंच पर्वतावर ४१ फुटांची भगवान बाहुबलीची भव्य प्रतिमा उभारण्यात आली. या भव्य मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला. त्याआधी गर्भ कल्याणक, जन्मकल्याणक, तपकल्याणक, ज्ञानकल्याणक, मोक्षकल्याणक असे विशेष विधी करण्यात आले. प्रतिष्ठाचार्य सुभाषभाई शेठ आणि बालब्रह्मचारी हेमंतभाई गांधी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने हे विधी केले.