सव्वा कोटींच्या पगाराचे पॅकेज सोडून प्रांशुक कांठेड बनले जैन मुनी; २८ व्या वर्षी घेतली दीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 09:09 AM2022-12-29T09:09:00+5:302022-12-29T09:09:49+5:30
अमेरिकेतील डेटा सायंटिस्टच्या जॉबवर सोडले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
देवास (म.प्र): अमेरिकेत डेटा सायंटिस्ट म्हणून काम करणाऱ्या आणि वार्षिक सव्वा कोटींचे पॅकेज असलेल्या प्रांशुक कांठेड या २८ वर्षीय तरुणाने चक्क या स्वप्नवत वाटणाऱ्या नोकरीवर पाणी सोडून जैन मुनींची दीक्षा घेतली आहे.
तरुण वयातयच प्रांशुक यांना विरक्ती आली. त्यामुळे जैन मुनी म्हणून दीक्षा घेण्याचे बीज त्यांच्यात दीड वर्षांपूर्वीच रोवले गेले. अमेरिकेतील १.२५ कोटींच्या पॅकेजची नोकरी सोडून ते देवास येथे आले. सोमवारी त्यांनी जैन मुनी होण्याची दीक्षा घेतली. प्रांशुक यांच्याबरोबरच त्यांच्या मामाचा मुलगा थांडला येथील रहिवासी मुमुक्षू प्रियांश लोढा (एमबीए) आणि रतलामचा मुमुक्षू पवन कासवान दीक्षित यांनीही याच मार्गाने चालण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी सकाळी हाटपिपल्या मंडीच्या प्रांगणात तिघांनीही उमेश मुनींचे शिष्य जिनेंद्र मुनी यांच्याकडून जैन संत होण्याची दीक्षा घेतली. या सोहळ्याला हजारो लोक उपस्थित होते.
तिन्ही मुमुक्षू बंधूंची महाभिनिष्क्रमण यात्रा
मुख्य दीक्षा सोहळ्यात तिन्ही मुमुक्षू बंधूंची महाभिनिष्क्रमण यात्रा काढण्यात आली. ही यात्रा कृषी उत्पन्न बाजार आवारात असलेल्या दीक्षा महोत्सव मंडपात पोहोचली. जिथे प्रवर्तक जिनेंद्र मुनीजींनी हजारो लोकांच्या उपस्थितीत तिघांनाही दीक्षा दिली.
कौटुंबिक पार्श्वभूमी : देवास येथील हाटपिपल्या येथील रहिवासी असलेल्या प्रांशुक यांचे वडील राकेश कांठेड हे व्यापारी आहेत. आता त्यांचे संपूर्ण कुटुंब इंदूरमध्ये राहते. प्राशुंक यांना अमेरिकेतच २०१७ मध्ये डेटा सायंटिस्टची नोकरी मिळाली. अमेरिकेतही ते गुरुभगवंतांचे ग्रंथ वाचत राहिले. इंटरनेटवरून त्यांचे प्रवचन ऐकत राहिले. नोकरीचा भ्रमनिरास होऊन ते जानेवारी, २०२१ मध्ये मायदेशी परतले. प्रांशुक यांची आई आणि त्यांचा लहान भाऊ येथेच असतो.