हैदराबाद : तिरुपतीला भेट देणाऱ्या भाविकांना लवकरच शून्य आधारित अर्थसंकल्पीय नैसर्गिक शेती (सेंद्रिय) उत्पादन आणि कीटकनाशके, रासायनिक खते आणि पालापाचोळा मुक्त कृषी उत्पादनापासून तयार करण्यात आलेला नैवेद्यम, लाडू प्रसादम आणि अन्न प्रसादम मिळणार आहे. तिरुमला मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना हे लाडू मिळतीलच. याशिवाय अण्णावरम, श्रीकलाहस्ती आणि श्रीसैलमसह अन्य १२ मंदिरातही मिळणार आहे. आंध्र प्रदेश विपणन महासंघ खरेदी करून कीटकनाशक मुक्त कृषी मालापासून तयार केलेले लाडू, प्रसाद या १२ मंदिरांनाही पुरविणार आहे.
स्वयंपाकाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी देवस्थानने पुढाकार घेतला आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेती हा उपक्रम २०१६ मध्ये आंध्र प्रदेशात सुरू झाला होता. राज्याने ६.२५ लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे हा जगातील सर्वांत मोठा नैसर्गिक शेती कार्यक्रम बनला.
शेती ते मंदिर...: तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) यावर्षी २५ हजार शेतकऱ्यांकडे अशा १२ प्रकारच्या २२ हजार टन रसायनमुक्त कृषीमालाची मागणी नोंदविली आहे. ५ हजार स्वयं-सहाय्यता गटाकडून तयार करण्यात आलेला हा कृषिमाल आंध्र प्रदेश विपणन महासंघ खरेदी करून टीटीडीला पुरविणार आहे. शून्यावर आधारित अर्थसंकल्पीय नैसर्गिक कृषी उत्पादन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानम आपल्या गोशाळेतून पशुधन देणार आहे. आंध्र प्रदेशातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना १,३५५ गायी दिल्या जाणार आहेत.
सामुदायिक प्रयत्न : रयथु साधिकारा संस्था ही कृषी उत्पादनांचा प्रचार आणि खरेदीसाठी गावातील संस्थांसोबत काम करत आहे. या माध्यमातून ८००० लोकांची फौज तयार करण्यात आली आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेती करणारे शेतकरी पेरणीसाठी आरवायएसएसने सुचविलेल्या नऊ प्रकारच्या बियाण्यांचा वापर करतात, असे आरवायएसएसचे कार्यकारी उपाध्यक्ष टी. विजय कुमार यांनी सांगितले. सेंटर फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. व्ही. रमांजनेयुलू म्हणाले की, अनेक जिल्ह्यांमध्ये याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे.