ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 19- उत्तर प्रदेशमधील मंदिरांमध्ये गायीच्या दूधापासून बनवलेल्या मिठाईचा प्रसाद भाविकांना मिळणार आहे. येत्या नवरात्रीपासून दुधापासून बनवलेल्या मिठाईचा प्रसाद मंदिरात येणाऱ्या भाविकांना दिला जाणार आहे. दुग्धविकास मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. गायीच्या दुग्ध उत्पादनांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातं आहे. सध्या उत्तर प्रदेशातील मोठ्या धार्मिक स्थळांवर याची सुरूवात करणार असल्याचही लक्ष्मीनारायण चौधरी यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशमध्ये म्हशीचं दूध ३५ रूपये लिटर आणि गायीचं दूध २२ रूपये लिटर दराने मिळतं. राज्य सरकार गायीचे दूध ४० ते ४२ रूपये लिटर दरापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे गायीचं योग्य पालनपोषण होऊ शकेल आणि उत्पन्न मिळत नसल्याचं कारण देत त्यांना कोणी सोडूनही देणार नाही. छत्तीसगडमध्ये गायीचं दूध ६० रूपये लिटरने तर मथुरामध्ये ४५ रूपये दराने विकलं जाते. गायीच्या दुधापासून बनलेले तूप ११०० रूपये प्रतिकिलो दराने विकलं जातं, असं दुग्धविकास मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा
स्वतंत्र झेंड्याची कर्नाटकची मागणी केंद्राने फेटाळली
सरींचा जोर कायम; पुढचे दोन दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
‘लोकमत’तर्फे आज दिल्लीत ८ आदर्श संसदपटूंचा गौरव !
दुग्धविकास विभाग गायीच्या दुधापासून बनवलेल्या उत्पादनांना नवरात्रीपासून बाजारात आणण्यासाठीची तयारी करत आहे. विशेषकरून विंध्याचल, काशी, मथुरा, अयोध्यासारख्या मोठ्या धार्मिक स्थळांमध्ये गायीच्या दुधापासून बनवलेली मिठाई उपलब्ध करण्याची तयारी सरकार करतं आहे. उत्पादन वाढलं तरच गायीच्या दुधाला किंमत मिळेल तसंच लोकही गायीचं संरक्षण करतील, असं लक्ष्मीनारायण चौधरी म्हणाले आहेत.
आम्ही हिंदुत्वाच्या अजेंड्यासाठी गायीचा मुद्या पुढे करत असल्याची टीका विरोधी पक्ष करतो. वास्तव हे आहे की, गायीच्या दुधामुळे मनुष्याची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. गायीचे दूध किडनी, कर्करोगसारख्या आजारांमध्ये फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलही वाढण्यापासून रोखण्यास मदत होते, असेही त्यांनी या वेळी सांगितलं आहे.