हरीश गुप्ता नवी दिल्ली : प्रसार भारतीसाठी स्वतंत्र भरती मंडळ (रिक्रुटमेन्ट बोर्ड) स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १९९७ मध्ये प्रसार भारती (भारतीय नभोवाणी महामंडळ) अधिनियम १९९० तहत स्वायत्त संस्था म्हणून प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली होती. २३ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या प्रसार भारतीचे हे स्वत:चे पहिले स्वतंत्र भरती मंडळ असेल.
वरिष्ठ पत्रकार जगदीश उपासने यांची १ जुलै रोजी भरती मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीपासून भारत सरकारमधील सहसचिव पदावरील अधिकाऱ्यापेक्षा कमी वेतन असलेल्या पदावर व्यक्तींची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी पाच सदस्यांचे स्वतंत्र भरती मंडळ स्थापन करण्यात करण्यात आले असून, या मंडळाच्या अध्यक्षपदी उपासने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळामार्फत प्रसार भारतीच्या अखत्यारीत येणाºया विविध संस्थांत (आकाशवाणी, टीव्ही वाहिन्या आदी) व्यक्तींची नियुक्ती केली जाईल.
काही महिन्यांपूर्वी सूर्य प्रकाश हे निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी सरकार प्रसार भारतीच्या नवीन चेअरमनची नियुक्ती करणार आहे.भरती मंडळाचे सदस्य प्रसार भारतीच्या स्वतंत्र भरती मंडळात माहिती व नभोवाणी मंत्रालयालातील सहसचिव (बी-द्वितीय) मंडळाचे पदसिद्ध सदस्य असतील. मंडळाच्या सदस्यांत दीपा चंद्र (सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक, कार्यक्रम प्रसार भारती), पी.एन. भक्त (सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक (अभियांत्रिकी), किम्बुओंग किपगेन (सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ), चेतन प्रकाश जैन (सरव्यवस्थापक, मनुष्यबळ, रेल्वे विकास महामंडळ लिमिटेड) यांचा समावेश आहे.