नवी दिल्ली : ‘सीबीआय’च्या हंगामी संचालकपदी एम. नागेश्वर राव यांच्या नेमणुकीच्या संदर्भात केलेल्या टष्ट्वीटवरून अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेत वकील प्रशांत भूषण यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आपल्याकडून चूक झाल्याची कबुली दिली. ती लक्षात घेऊन वेणुगोपाळ यांनी अवमानना याचिका मागे घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, ती मान्य करून प्रकरण लगेच निकाली न काढता त्यानिमित्ताने उपस्थित झालेल्या मुद्यांवर आपण निकाल देऊ, असे सूचित केले.न्या. अरुण मिश्रा व न्या. नवीन सिन्हा यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण आले तेव्हा भूषण यांनी संबंधित टष्ट्वीट करण्यात आपल्याकडून चूक झाल्याचे प्रांजळपणे कबूल केले. मात्र, या सुनावणीतून न्या. मिश्रा यांनी बाजूला राहावे, असा अर्ज त्यांनी केला. असा अर्ज केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यासही त्यांनी नकार दिला. भूषण यांनी चूक कबूल केल्याने हे प्रकरण संपवावे, या भूमिकेवर वेणुगोपाळ ठाम राहिले. न्यायप्रविष्ट प्रकरणात सहभागी असलेल्या वकिलाने टीकाटिप्पणी करण्याला पायबंद करता येईल का, यावर ३ एप्रिल रोजी न्यायालय विचार करणार आहे.>दिशाभूल केल्याचे केले होते टष्ट्वीटनागेश्वर राव यांच्या नेमणुकीचा निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनेच घेतल्याचे सांगून अटर्नी जनरलनी त्या बैठकीचे इतिवृत्त प्रशांत भूषण यांनीच दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयात सादर केले होते. त्यादिवशीचे कामकाज संपल्यावर प्रशांत भूषण यांनी अटर्नी जनरलनी कदाचित बनावट इतिवृत्त सादर करून न्यायालयाची दिशाभूल केली असावी, असे टष्ट्वीट केले होते. त्यावरून वेणुगोपाळ यांनी ही अवमानना याचिका केली आहे.
प्रशांत भूषण यांनी चूक केल्याची दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 6:03 AM