चंदीगड : राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना आता पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे प्रमुख सल्लागार म्हणून प्रशांत किशोर आता काम पाहणार आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. (prashant kishor appointment as principal advisor to the cm captain amarinder singh and status of a cabinet minister)
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एक ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली. मला सांगायला आनंद होत आहे की, प्रशांत किशोर यांची माझे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाबच्या जनतेच्या कल्याणासाठी एकत्रित काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे, असे अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
प्रशांत किशोर किती वेतन घेणार?
प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर केवळ एक रुपया वेतन घेणार आहेत. तसेच प्रशांत किशोर यांना बंगला, कार्यालय, संपर्क माध्यमे अशा अनेक प्रकारच्या सुविधा पंजाब सरकारकडून दिल्या जाणार आहेत. तसेच कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे प्रवास, मेडिकल आणि अन्य सुविधा प्रशांत किशोर यांना दिल्या जातील, असे सांगितले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हनुमान, कोरोना लस ही संजीवनी; भाजप नेत्याची स्तुतीसुमनं
प्रशांत किशोर यांचा कार्यकाळ किती?
प्रशांत किशोर यांच्या कार्यकाळाबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणे प्रशांत किशोर यांचा कार्यकाळ असेल. प्रशांत किशोर यांना एक खासगी सचिव, एक डेटा एन्ट्री ऑपरेटर, क्लार्क आणि दोन शिपाई दिले जाणार आहेत. एवढेच नव्हे, तर प्रशांत किशोर यांच्या मोबाइल आणि संपर्काचा खर्चही सरकारकडून केला जाईल, असे सांगितले जात आहे.
पंतप्रधान मोदींनी सर्वांत आधी कोरोना लस का घेतली नाही; काँग्रेसचा सवाल
दरम्यान, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही यापूर्वी अनेकदा प्रशांत किशोर यांच्या कार्याबाबत कौतुकोद्गार काढले आहेत. २०१७ मध्ये प्रशांत किशोर यांच्यावर पाच राज्यांचे निवडणूक कार्यक्रम, प्रचार आणि रणनीती तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यामध्ये केवळ पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमताचे सरकार स्थापन करण्यास यश मिळाले आहे. परंतु, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला फारसी चमक दाखवता आली नाही. तरीही प्रशांत किशोर यांची काँग्रेसकडून स्तुती करण्यात आली होती. तसेच सन २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रशांत किशोर यांना रणनितीकार म्हणून सोबत घेतले होते. यानंतर प्रशांत किशोर यांनी जनता दल युनायटेड पक्षासाठीही काम केले.