नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबतच्या चर्चांना अखेरीस गेल्या मंगळवारी पूर्णविराम मिळाला. स्वत: किशोर यांनीच काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव नम्रपणे नाकारत असल्याचे ट्विट केले. त्यानंतर लगोलग काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या ट्विटला दुजोरा दिला. दरम्यान, आज तकच्या एका कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी यासंदर्भातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी राहुल गांधी किंवा प्रियांका वाड्रा हे दोघेही काँग्रेसला देण्यात आलेल्या लीडरशिपच्या फॉर्म्युल्यात नव्हते. काँग्रेसला कोणत्याही पीकेची गरज नाही. राहुल गांधींनी मला भाव द्यावा, एवढी माझी उंची मोठी नाही. काँग्रेसला जे सांगायचे होते, ते मी सांगितले, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. तसेच, प्रशांत किशोर म्हणाले की, 'आपण काँग्रेसला आधीच सांगितले होते की, पाच राज्यांमध्ये काँग्रेसची कोणतीही विजयाची शक्यता नाही.'
येत्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांची तयारी काय असणार? असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, 2024 ची तयारी नाही. याबरोबर, नरेंद्र मोदींना आव्हान देण्याच्या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले, '2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना कोण आव्हान देईल, याची मला कल्पना नाही.' याशिवाय, ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करताना मला कोणतीही अडचण आली नाही. त्यांच्यासोबत माझा कधीही वाद झाला नाही, असेही प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोरांचा काँग्रेसमध्ये येण्यास नकारदरम्यान, नुकतेच प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात येण्यास नकार दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, मात्र दोन दिवसांपूर्वी ती चर्चा थांबली.आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यशाची चव चाखता यावी यासाठी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांच्याकडे चिंतन शिबिरापूर्वी संघटनेतील सक्षम कृतिगटाचे नेतृत्व सोपविण्याची तयारीही झाली होती. परंतु या सर्व चर्चांना स्वत: प्रशांत किशोर यांनी मंगळवारी पूर्णविराम दिला.