ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच युपीए आता राहिलीय कुठे? अस्तित्वात नसल्याचे म्हणत काँग्रेसव्यतिरिक्त विरोधकांनी मोट बांधण्याचे उघड उघड संकेत दिल्यानंतर काँग्रेस नेते संतापले आहेत. काहींनी काँग्रेसशिवाय भाजपाविरोधात विजय मिळविणे शक्य नाही, असे म्हटले आहे. तर काहींनी ममता सीबीआय, ईडीच्या भीतीमुळे असे बोलत असल्याचे म्हटले आहे. आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला आरसाच दाखविला आहे.
तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसच्या पर्यायी विरोधक देण्याच्या लढाईत आता राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची एन्ट्री झाली आहे. ममता यांनी राहुल गांधींवर नाव न घेता परदेशात जाऊन राहणारे भाजपाला हरवू शकणार नाहीत असा टोला हाणला होता. यावर शरद पवारांनीही संमती दर्शविली होती. आता देशात काँग्रेसी नेते ममता यांना लक्ष्य करू लागले आहेत. तर गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस एकटी लोकसभेच्या 300 सीट जिंकू शकत नसल्याचे म्हटले आहे.
यावर आता प्रशांत किशोर यांचे वक्तव्य आले आहे. काँग्रेसने गेल्या 10 वर्षांत 90 टक्के निवडणुका गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत विरोधकांचे नेतृत्व करणे हा काँग्रेसचा दैवी अधिकार असू शकत नाही, असे सुनावले आहे.
काँग्रेस ताकदवान विरोधी पक्षांसाठी ज्या विचाराने आणि विस्ताराचे प्रतिनिधित्व करते, ते महत्वाचेआहे. मात्र, विरोधकांचे नेतृत्व करणे हा काही काँग्रेसचा दैवी अधिकार नाही. काँग्रेस पक्ष गेल्या 10 वर्षांत 90 टक्के निवडणुका हरला आहे, यामुळे आता लोकशाही पद्धतीने विरोधी नेतृत्व ठरविण्यास द्यावे, असे प्रशांत किशोर म्हणाले.