Prashant Kishor : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ७१ मंत्र्यांसह आपला कारभार सुरु केला आहे. या सरकारच्या स्थापनेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचा मोठा वाटा आहे. अशातच आता राजकीय रणनीतीकार बनलेले नेते प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आरोप केले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्तेत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श केल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करून बिहारला लाज आणली अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.
जन सुरज अभियानाअंतर्गत शुक्रवारी भागलपूरमध्ये एका सभेत बोलताना प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. "लोक मला विचारतात की मी नितीश कुमार यांच्यासोबत यापूर्वी काम केले असूनही मी त्यांच्यावर टीका का करतो? पण, त्यावेळी तो वेगळा माणूस होता. त्यांच्यातील विवेकबुद्धी आता कमी होत चाललली आहे," असे प्रशांत किशोर यांनी म्हटलं. प्रशांत किशोर यांनी २०१५ मध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडीयूच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती. दोन वर्षांनंतर त्यांनी औपचारिकपणे जेडीयूमध्ये प्रवेश केला. मात्र, नितीश कुमार यांच्याशी मतभेद झाल्यानंतर २०२० मध्ये त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर बोलताना प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीचा हवाला देत नितीशकुमार यांच्यावर भाष्य केले. एनडीएच्या या बैठकीत नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा देणारे भाषण केले. भाषण संपवून पुन्हा आपल्या आसनावर बसलताना नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाय स्पर्श करताना दिसले. मात्र, पंतप्रधानांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. या घटनेवरून प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली.
“काही दिवसांपूर्वी देशाने पाहिले असेल की,माध्यमातील लोक भारत सरकारची कमान नितीश कुमार यांच्या हातात असल्याचे सांगत होते. नितीशकुमारांची इच्छा नसेल तर देशात सरकार स्थापन होणार नाही. नितीशकुमार यांच्या हातात इतकी सत्ता आहे. पण ते म्हणाले, नितीश कुमारांनी त्या बदल्यात काय मागितले? बिहारच्या मुलांना रोजगार मागितला नाही. बिहारमधील जिल्ह्यांमध्ये साखर कारखाने सुरू झाले पाहिजेत, अशी मागणी केली नाही. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी नव्हती. बिहारचे लोक विचार करत असतील की मग त्यांनी काय मागितले? २०२५ नंतरही मुख्यमंत्री राहावे आणि यासाठी भाजपनेही पाठिंबा द्यावा, अशी मागणी नितीश कुमार यांनी केली. त्यांनी बिहारच्या सर्व जनतेची इज्जत विकली," असे प्रशांत किशोर म्हणाले.
"१३ कोटी जनतेचा नेता, जो आपल्या जनतेचा अभिमान आणि आदर आहे, तो मुख्यमंत्री राहण्यासाठी संपूर्ण देशासमोर नतमस्तक होऊन पाय स्पर्श करत आहे. पण नितीश कुमार यांनी मोदींच्या पायाला हात लावून बिहारला लाजवले," अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात नितीश कुमार यांच्या पक्षाने १२ जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत जेडीयू हा भाजपचा दुसरा सर्वात मोठा मित्रपक्ष आहे.