नवी दिल्ली: मिशन २०२४ साठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरकाँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. किशोर यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. पक्ष मजबूत करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यासंदर्भात प्रेझेंटेशन दिलं. त्यामुळे किशोर काँग्रेसमध्ये कधी सहभागी होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. मात्र किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार नसल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.
काँग्रेस अध्यक्षांनी सक्षमीकरण कृती गटाची स्थापना केली. प्रशांत किशोर यांना जबाबदारी देत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलं. मात्र त्यांनी नकार दिली. त्यांना पक्षाच्या मजबुतीसाठी दिलेल्या शिफारशींचं आणि सल्लांचं आम्ही कौतुक करतो, असं सुरजेवालांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
प्रशांत किशोर यांनीही ट्विट करत काँग्रेसचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती दिली. सक्षणीकरण कृती गटाचा भाग होण्यासाठी मला प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र मी तो नाकारला. माझ्यापेक्षा पक्षाला नेतृत्त्वाची गरज आहे. जमिनी स्तरावरील संघटनात्मक समस्या सोडवण्यासाठी परिवर्तन घडवणाऱ्या सुधारणांची आवश्यकता आहे, असं किशोर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
आगामी निवडणुकीसाठी पक्षाचं धोरण निश्चित करण्याचं काम सक्षमीकरण कृती गट करणार आहे. काँग्रेसच्या भवितव्याचा विचार करून ६ समित्या तयार करण्यात आल्या. या समित्यांचं संयोजकपद मल्लिकार्जुन खर्गे, सलमान खुर्शीद, पी. चिदंबरम, मुकूल वासनिक, भूपिंदर सिंह हुड्डा आणि अमरिंदर सिंह वारिंग यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.