नवी दिल्ली: काँग्रेसमध्ये सहभागी व्हा, सक्षमीकरण कृती गटाचे सदस्य व्हा, अशी ऑफर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना दिली होती. मात्र किशोर यांनी प्रस्ताव नाकारला आणि काँग्रेस प्रवेश करण्यास नकार दिला. किशोर यांनी काँग्रेसचा प्रस्ताव नाकारण्यामागचं कारण त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.
काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या. तब्बल ६०० स्लाईड्सचं प्रेझेंटेशन दिलं. मात्र किशोर यांनी सुचवलेल्या बदलांसंदर्भात काँग्रेस पक्ष गंभीर नव्हता. त्यामुळे किशोर यांनी काँग्रेसची ऑफर नाकारल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. पक्षातील बदलांसंदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेले. राहुल यांचं हे वागणं किशोर यांना खटकलं.
काँग्रेसमध्ये बदल घडवण्यासाठी प्रशांत किशोर यांनी तीन वेळा सोनिया गांधींची भेट घेतली. मात्र महत्त्वाच्या बैठका सुरू असताना राहुल गांधी अचानक परदेशी निघून गेले. त्यामुळे किशोर यांना धक्काच बसला, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. काँग्रेसमध्ये बदल करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा होता. त्यावेळी राहुल परदेशात गेले. पक्षासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी घेण्याऐवजी राहुल त्यापासून दूर राहिले. राहुल यांना परदेश दौरा रद्द करणं शक्य होतं. मात्र राहुल यांना तसं केलं नाही. राहुल यांची ही वर्तणूक प्रशांत किशोर यांना खटकली, असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.
आमच्यासोबत येण्याची इच्छा असलेल्यांसाठी आमचे दरवाजे कायम उघडे असल्याचं आज काँग्रेसनं म्हटलं. 'पक्षात बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नेते आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच बदल करू,' असं पक्ष प्रवक्ते पवन खेडा यांनी सांगितलं.