निवडणूक चाणक्य प्रशांत किशोर (Prashant Kishore) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात होऊ लागली आहे. मात्र, काँग्रेसमध्ये यावरून दुफळी माजण्याची शक्यता आहे. एका गटाने प्रशांत किशोर यांना जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्या घरी एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये येण्यावरून चिंता व्यक्त करण्यात आली होती. (janmashtami celebrations at Congress leader Kapil Sibal’s residence on August 30 provided the perfect setting for the G-23 talk on Prashant Kishor.)
जन्माष्टमीच्या दिवशी कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीला काँग्रेसचे 23 नेते ज्यांना G-23 म्हटले जाते, ते उपस्थित होते. हे नेते प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये घेण्याविरोधात आहेत. असे झाल्यास पक्षातील निर्णय हे आऊटसोर्स होतील, अशी भीती त्यांना वाटत आहे. महत्वाचे म्हणजे या बैठकीत काही नेते हे कधी काळी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी बाजू मांडत होते.
एका वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांच्या येण्याच्या चर्चांनी हा गट नाराज आहे. हा गट दोन वर्षांपूर्वीच गांधी परिवारावर नाराज आहे. G-23 बैठकीत प्रशांत किशोर यांना महासचिव पदावर नियुक्त करण्याच्या पक्षाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सहभागी एका नेत्याने सांगितले की, आम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिले आहे, प्रशांत किशोर यांचे यश हे मर्यादित आहे. त्यांच्या पक्षात प्रवेशावर काँग्रेसच्या वर्किंग ग्रुपमधील बैठकीत चर्चा करण्यात यावी.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते एके अँटोनी (AK Antony) आणि अंबिका सोनी (Ambika Soni) यांना प्रशांत किशोर यांच्याबाबत पक्षाच्या नेत्यांचे विचार काय आहेत, याचा अहवाल बनविण्यास सांगितले आहे. या बैठकीत गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, मनीष तिवारी, भूपिंदर सिंह हुड्डा यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.