अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फरक पडणार नाही; प्रशांत किशोरांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 04:30 PM2023-07-05T16:30:55+5:302023-07-05T16:35:54+5:30
Prashant Kishor Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
Prashant Kishor Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत पडलेल्या या फुटीनंतर आज मुंबईत अजित पवार आणि शरद पवार गटाचे मेळावे झाले. यात दोन्ही बाजुंच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली. आता या सर्व घडामोडीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) सध्या बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये जन सूरज पदयात्रा करत आहेत. 2 जुलैपासून समस्तीपूरमध्ये त्यांची पदयात्रा सुरू झाली आहे. आपल्या यात्रेदरम्यान, ते सर्वच पक्षांवर सातत्याने टीका करत आहेत. यातच आता गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीवर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी (4 जुलै) मोठे वक्तव्य केले आहे.
प्रशांत किशोर म्हणाले की, काही आमदार पक्षातून बाहेर पडल्याने त्या पक्षाच्या समर्थकांवर त्याचा काहीही परिणा होणार नाही. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्ष सोडल्यास त्यांचे समर्थकही पक्ष सोडतील, असे नाही. हा माझा विश्वास आहे. प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते. बिहारच्या बाबतीत, जेव्हा महाआघाडी स्थापन झाली, तेव्हा त्याचा थेट परिणाम राष्ट्रीय राजकारणावर झाला नाही. महाराष्ट्रात घडलेली घटना तिथली खास घटना आहे. ते योग्य की अयोग्य हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवायचे आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले.