Prashant Kishor: ५२ पानं उघड, अजून ५४८ बाकी! काँग्रेससाठी प्रशांत किशोरांचा मास्टर प्लान, आज पुन्हा सोनियांची घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 11:22 AM2022-04-22T11:22:00+5:302022-04-22T11:24:40+5:30
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये समावेश करण्याच्या दिशेने आज मोठे पाऊल पडणार आहे. किशोर आज सहाव्यांदा काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेणार आहेत.
नवी दिल्ली-
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये समावेश करण्याच्या दिशेने आज मोठे पाऊल पडणार आहे. किशोर आज सहाव्यांदा काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेणार आहेत. गुरुवारी देखील त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. प्रशांत किशोर यांच्याबाबत काँग्रेसने स्थापन केलेली समितीही आज आपला अहवाल काँग्रेस अध्यक्षांना सादर करेल आणि काही दिवसांनी काँग्रेस प्रशांत किशोर यांच्याबाबत अधिकृत घोषणा करेल, अशी माहिती समोर आली आहे. चर्चेच्या गेल्या पाच फेऱ्यांमध्ये प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी आतापर्यंत ६०० स्लाइड्सपैकी फक्त ५२ स्लाइड्सचे प्रेझंन्टेशन पक्षश्रेष्ठींसमोर सादर केले आहे. काँग्रेसला बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेल्या टिप्समध्ये त्यांनी पक्षाने जुन्या तत्त्वांकडे परत जावे, तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ द्यावे, युतीशी संबंधित समस्या सोडवाव्यात, पक्षाच्या संपर्क व्यवस्थेत बदल करावा आणि कायमस्वरूपी पक्षाध्यक्ष नेमावा, असे सांगितले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षासमोर महात्मा गांधींच्या 'भारतीय राष्ट्रीय कांग्रेस को कभी मरने नहीं दिया जा सकता, यह सिर्फ राष्ट्र के साथ मर सकती है।' या वाक्याने आपल्या प्रेझेंटेशनची सुरुवात केली. काँग्रेस पक्षातील प्रशांत किशोर यांची भूमिका आज ठरणार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी त्याच्या सादरीकरणात 4M वर भर दिला आहे. हे M म्हणजे संदेश, मेसेंजर, मिशनरी आणि मॅकेनिक्स असे आहेत. म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना जनतेपर्यंत कोणता मेसेज द्यायचा आहे. तो लोकांपर्यंत कोण घेऊन जाणार, लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग काय असेल आणि या सगळ्यातून उपलब्ध असलेल्या अनुभवाचा तसेच डेटाचा कसा फायदा होईल. याचा विचार केला जाणार आहे.
भाजपाच्या उग्र राष्ट्रवादाला तोडण्याची योजना
स्वातंत्र्यलढा लढवणारी काँग्रेस हळूहळू आपले आदर्श विसरत चालली आहे, असंही प्रशांत किशोर यांचे मत आहे. सरदार पटेलांना भाजपानं आणि इतरांना इतर पक्षांनी महत्व दिलं. सध्या परिस्थिती अशी आहे की काँग्रेस जवाहरलाल नेहरूंच्या बाजूनं म्हणावं तितके बोलत नाही असं प्रशांत किशोर यांनी प्रेझन्टेशनमध्ये नमूद केल्याचं सांगितलं जात आहे. गांधी कुटुबीयांनी प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये येण्याचा मार्ग मोकळा केल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यावर सर्वमान्यांचं मत बनवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात बुधवारी काँग्रेस पक्षानं प्रशांत किशोर यांच्या संदर्भात एक बैठक बोलावली होती. ज्यामध्ये छत्तीसगड आणि राजस्थान या दोन काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता आणि त्यांचे मत जाणून घेण्यात आले.