पाटणा : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) सध्या बिहार राज्यात 'जन सूराज' यात्रेवर आहेत. या यात्रेदरम्यान प्रशांत किशोर सातत्याने अशी विधाने करत आहेत, ज्यामुळे बिहारच्या राजकारणात नवनवीन चर्चा सुरू होत आहेत. प्रशांत किशोर गेल्या 25 दिवसांपासून जन सूराज यात्रेवर आहेत. 2 ऑक्टोबर रोजी प्रशांत किशोर यांनी बेतिया येथील भीतिहारवा येथून या प्रवासाला सुरुवात केली होती.
या जन सूराज यात्रेदरम्यान ते सर्व पंचायतींना भेटी देत आहेत. दरम्यान, या यात्रेचा सर्व खर्च कोण करत आहे, याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर स्वतः पीके यांनीच दिले. त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रशांत किशोर यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या या जन सूराज यात्रेचा सर्व खर्च देशातील सहा मुख्यमंत्री उचलत आहेत. हे मुख्यमंत्री नेमके कोण आहेत, त्याची माहिती अद्याप कळू शकली नाही.
माध्यमांशी संवाद साधताना पीके म्हणाले की, 'यात्रेदरम्यान लागणारे मोठे स्टेज, रॅलीचा खर्च किंवा प्रवासासाठी लागणारा हेलिकॉप्टरचा खर्च मी करत नाहीये. मी जिंकून दिलेल्या सहा राज्यांचे मुख्यमंत्री हा सर्व खर्च उचलत आहेत. मी कधीही कोणाकडून पैसे मागितले नाही.' विशेष म्हणजे, पीकेंनी आतापर्यंत 11 निवडणुकांमध्ये काम केले असून, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्यांनी मदत केलेल्या बहुतांश पक्षांचे सरकार त्या-त्या राज्यांमध्ये आले आहे.