नवी दिल्ली: मागील काही निवडणुकांमध्ये काँग्रेसला (Congress) सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. पण, आता देशातील सर्वात जुन्या पक्षाला पुन्हा रुळावर कसे आणायचे, यावर मंथन सुरू आहे. यासाठी काँग्रेसने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची मदत घेतली आहे. काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रशांत किशोर यांनी एक मोठी योजना आखल्याचे बोलले जात आहे. याअंतर्गत काँग्रेसमध्ये गांधी घराण्याची भूमिका काय असावी, असा सल्लाही त्यांनी पक्षाला दिला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला पक्षात उपाध्यक्ष पद निर्माण करण्यास सांगितले आहे. या पदावर बसलेली व्यक्ती निवडणूक टास्क फोर्सची देखरेख करेल. म्हणजेच तो देशभरातील निवडणुकीची रणनीती तयार करेल. उपाध्यक्ष पक्षाध्यक्षांसोबत मिळून काम करेल. विशेष म्हणजे गांधी घराण्यातील एकही सदस्य या पदावर राहणार नाही, पण अध्यक्षपद गांधी कुटुंबाच्याच ताब्यात असेल, असा सल्लाही किशोर यांनी दिला आहे.
संसदीय मंडळ स्थापन करण्याबाबत सल्लाप्रशांत किशोर यांनी काँग्रेसला संसदीय मंडळ स्थापन करण्याचाही सल्ला दिला आहे. असाच प्रस्ताव G-23 च्या असंतुष्ट नेत्यांनीही दिला होता. किशोर यांनी काँग्रेसला पक्षनेतृत्वाचा प्रश्न ताबडतोब सोडवण्यास सांगितले आहे. गेल्या चार दिवसांपासून पक्षात सुधारणा कशा करायच्या हे किशोर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगून, त्याबाबत सातत्याने प्रेझेंटेशन देत आहेत.
निवडणूक कशी लढवायची?प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला लोकसभेच्या 370 जागांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले असल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने केला जात आहे. या जागा 17 राज्यांतील आहेत. पाच राज्यांतील उर्वरित जागांवर काँग्रेसला इतर पक्षांसोबत युती करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांनी पक्षाला महाराष्ट्र, झारखंड, बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इतरांशी हातमिळवणी करण्यास सांगितले आहे. यासोबतच काँग्रेसला आंध्र प्रदेशमध्ये वायएसआरसीपीसोबत युती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.