लोकसभा आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेडीयू, भाजप, आरजेडी आणि इतर सर्वच पक्ष बिहारमधील अति मागास वर्गाला आपल्याकडे आकर्शित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, जनसुराजचे प्रमुख आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार, लालू यादव आणि भाजप नेत्यांपेक्षाही एक पाऊल पुढे टाकले आहे. अति मागास प्रवर्गासाठी त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
"आपण लवकरच एका राजकीय पक्षाची स्थापन करणार आहोत आणि अति मागास समजल्या जाणाऱ्या समाजातील उमेदवार 75 टक्के जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहोत," असे पीके यांनी म्हटले आहे. याशिवाय, अति मागास 500 मुलांना मोफत शिक्षण आणि रोजगाराची संधी देण्याची घोषणाही पीके यांनी केली आहे.
अति मागास प्रवर्गातील लोकांना निवडणुकीत 75 टक्के जागा -प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी पाटणा येथे जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसुराजच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पीके म्हणाले, आपण लवकरच जनसुराज अभियानाचे राजकीय पक्षात रूपांतर करणार आहेत. या पक्षाच्या उभारणीत समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश असेल. विशेषत: अति मागास प्रवर्गातील लोकांना निवडणुकीत 75 टक्के जागा दिल्या जातील.
500 मुलांना मोफत शिक्षण -याशिवया, प्रशांत किशोर यांनी अति मागास प्रवर्गातील 500 मुलांना 'जन सुरज'च्या खर्चाने मोफत शिक्षण दिले जाईल, अशी घोषणाही केली. यावेळी, प्रत्येक जिल्ह्यातून 10 ते 12 मुले निवडली जातील, ज्यांना 'जन सूरज'तर्फे नोकरी मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही पीके यांनी म्हटले आहे.